बेळगाव : गोकाक येथील धबधबा व परिसर पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरले आहे. पावसाळ्यात येथे अक्षरशः जत्रा भरते. येथील मंत्रमुग्ध करणारे नैसर्गिक वातावरण लोकांना खेचून आणत आहे. या जबरदस्त ‘लोकेशन्स’वर फोटो न काढले तरच नवल. धबधब्याच्या कड्याजवळ आणि टोकावर धोकादायक स्थितीत सेल्फी व फोटोसेशन केले जात आहे. मात्र, असे करणे जिवावर बेतू शकते, याची कसलीही फिकीर तरुणाईला नाही. वीकेंडला गोकाक फॉल्सवर धबधबा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. सेल्फीच्या मोहापायी होणार्या दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला असून स्वतः गोकाक फॉल्सला भेट देऊन खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. तुम्हाला गोकाक फाॅल्सच्या मंदिराला जाता येवू शकते. लांबूनच धबधबा पाहता येवू शकतो; पण तुम्हाला जवळून गोकाक धबधबा पाहता येणार नाही; कारण पायर्यांच्या ठिकाणी पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स लावून जाण्यास निर्बंध घातले आहेत.
गोकाक तालुक्यातील धबधबा (गोकाक फॉल्स) अलीकडे कमालीचे लोकप्रिय झालेले ठिकाण आहे. तरुणाईबरोबरच आबालवृद्धांना या धबधब्यासह येथील वातावरणाची भुरळ पडली आहे. पावसाळ्यात येथील वातावरण अत्यंत मनमोहक असते. हा नयनरम्य परिसर व नजारे डोळ्याने पाहून मनात साठवण्यासाठी व कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी धडपड सुरू असते. मात्र, सेल्फी व फोटो काढण्यासाठी अनेकजण आपला जीव धोक्यात घालत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावर कोणाचाच अंकुश नसल्याने एखादी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. गोकाक फॉल्स, गोडचिनमलकी, हिडकल डॅम किंवा इतर कोणत्याही पाण्याच्या ठिकाणी सेल्फीचा मोह अनेकांना होतोच. या मोहापायी काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला असून पर्यटकांमध्ये जागृती करण्यात येत आहे.
वाऱ्याचा वेग जोरात असल्यास अजूनही पाणी जोराने फेकले जात आहे. हे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. शनिवारी व रविवारी विशेष गर्दी दिसून येते. अशा वेळी खाली उतरून फोटो व सेल्फी काढले जात आहेत. यात प्रचंड धोका आहे. वाऱ्याचा झोत मोठा आल्यास जिवावर बेतू शकते. मात्र, त्याची फिकीर कोणासही नसते. यावर कोण अन् कसा अंकुश ठेवणार, हा खरा प्रश्न आहे. प्रशासनाने अटकाव करूनही लोक स्वतःहून जीव धोक्यात घालत आहेत. यांना आवर घालणे जरुरीचे आहे, अन्यथा इतर स्थळांप्रमाणे या स्थळालादेखील गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Belgaum Varta Belgaum Varta