बेळगाव : बेळगावसह परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. मागील चार दिवसांपासून सततच्या पावसामुळे नदी, नाले प्रवाहित झाले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे तर रामदुर्ग तालुक्यात किमान पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात खानापूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 41.2 मी.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वात कमी म्हणजे फक्त 1.1 मी.मी. पावसाची नोंद रामदुर्ग तालुक्याची झाली आहे. पश्चिम घाटात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक पुल, बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. खानापूर तालुक्यातील मणतुर्गा येथील हालात्री नदीचा पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक सेवा ठप्प झालेली आहे. मलप्रभा नदीच्या नवनतीर्थ जलाशयामध्ये पाण्याची पातळी दोन फुटणी वाढली आहे. बेळगांव परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे मार्कंडेय नदी दुथडी भरून वाहत आहे तर बेळगांव शहराची तहान भागवणाऱ्या राकसकोप जलाशयात पाण्याची पातळी वाढली आहे. बेळगांव जिल्ह्यातील घटप्रभा नदीत 20 हजार क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले असून हिडकल जलाशयाची पाणी पातळी देखील वाढली आहे तर परिसरातील शेती हिरवीगार झाली आहे. बेळगाव जिल्ह्यात अवघ्या 24 तासात एकूण 141.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे .
बेळगाव परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक पुल पाण्याखाली गेले आहेत आणि गावांचा संपर्क तुटला आहे. घटप्रभा नदीचा गोकाक सिंगळापुरा पुल पाण्याखाली आला आहे. कृष्णा नदीचा मंगलावती पूल, जत्राट दिवशीपुर वेदगंगा नदीचा पूल देखील पाण्याखाली गेला असून जिल्हा पोलीस प्रशासनाने पाण्याखाली गेलेल्या पुलांचा वाहतुकीसाठी वापर करण्यास बंदी घातली आहे.