बेळगाव : वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आंबोलीसाठी दर शनिवार आणि रविवारी सुरू करण्यात येणारी विशेष बससेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. आंबोलीत अधिक पाऊस आणि दरड कोसळल्यामुळे परिवहनने हा निर्णय घेतला आहे. मात्र, येणाऱ्या आठवडाभरात ही बससेवा पुन्हा सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. मागील आठवडाभरापासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिवहनने गोकाक आणि आंबोली धबधब्यासाठी दुसरा, चौथा शनिवार-रविवार आणि शासकीय सुटीदिवशी विशेष बससेवा सुरू केली आहे. यापैकी गोकाकसाठी रविवारी विशेष बस सुरळीत धावली. मात्र, अतिवृष्टीमुळे आंबोलीकडे धावणारी बस थांबविण्यात आली आहे. मात्र, येत्या शनिवारी आणि रविवारी ही बस धावणार आहे. वर्षा पर्यटनासाठी धबधब्यांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. दरम्यान, पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने गोकाक आणि आंबोली धबधब्यांना विशेष बससेवा उपलब्ध करून दिली आहे. गतवर्षी या बससेवेला उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे परिवहनच्या महसुलात देखील वाढ झाली होती. यंदा देखील पावसाला सुरुवात होताच परिवहनने वर्षा पर्यटनासाठी बससेवा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, अतिपावसामुळे आंबोलीकडे धावणाऱ्या बस काही दिवस स्थगित करण्यात आली आहे. मात्र, येत्या शनिवार आणि रविवार ही बससेवा सुरळीत सुरू केली जाणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta