बेळगाव : आयुष्याच्या उत्तरार्धाकडे वाटचाल करत असलेल्या चाळीस वर्षांवरील नागरिकांना आणि ज्येष्ठांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी बेळगावमध्ये ‘जीवन संगीत’ या एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजता लोकमान्य रंगमंदिर, कोनवाळ गल्ली, बेळगाव येथे सुप्रसिद्ध म्युझिक थेरपीस्ट डॉक्टर संतोष बोराडे आणि त्यांचे सहकारी जीवन संगीत कार्यक्रम सादर करणार आहेत.
तत्पूर्वी सकाळी 9 ते 10:30 या वेळेत डॉ.सिद्धार्थ पुजारी मोफत डोळे तपासणी करणार आहेत. आश्रय फाउंडेशन आणि रिसोर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मनोरंजनासह संगीत ज्ञानाची अनुभूती देणा-या या कार्यक्रमात सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे. काही जागा ज्येष्ठ नागरिकांच्या साठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
गाणी, गोष्टी, विनोद, कलात्मक मस्ती, शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीत, विविध उपचारपद्धती, वैद्यकीय चमत्कार, प्रेक्षकांचे समूह नृत्य, गायन, प्रश्न-उत्तरे अशा अनेक विविध रंगांनी भरलेला हा कार्यक्रम बेळगावकरांसाठी पर्वणी ठरणार आहे.
मनुष्य आपल्या जीवनात दररोज ताण-तणाव, चिंता, भीती, आजारपण, आरोग्याच्या समस्या आदींशी झुंज देत असतो. याचदरम्यान मेंदूत हजारो विचार भावना व चिंता असतात. त्याचा परिणाम शरीरावर होऊन अनेक व्याधी जडतात. अशा परिस्थितीत मेंदूला काय आवडते यापेक्षा आवश्यक काय आहे हे जाणून घेऊन आनंददायी जीवनासाठी संगीताचा सकारात्मक आहार दिल्यास आपले जीवन आनंदी होऊ शकते याविषयीचे मार्गदर्शन ‘जीवन संगीत’चे प्रणेते डॉ. संतोष बोराडे हे करणार आहेत.
डॉ. संतोष बोराडे यांनी आतापर्यंत देश-विदेशात 3,500 हून अधिक सेमिनारचे आयोजन करत जेष्ठांसह महिला, विद्यार्थी, कॉर्पोरेट्स आणि आयएएस- आयपीएस अधिकाऱ्यांनाही प्रेरणादायी विचार करण्यास प्रोत्साहित केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta