बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष गोपाळराव देसाई व माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन आज शनिवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना देण्यात आले आले.
निवेदनाचा स्वीकार करून पालकमंत्र्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना देखील निवेदनाची प्रत देऊन आपल्या मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
त्याचबरोबर अलीकडेच खानापूर तालुक्यातील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र त्या जागी पर्यायी शिक्षकांची नेमणूक झाल्यानंतरच बदलिप्राप्त शिक्षकाना बदलीच्या ठिकाणी जाण्याची अनुमती देण्यात यावी. सध्यस्थीतीत खानापूर तालुक्यात शाळांच्या संख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे पर्यायी शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत बदलिप्राप्त शिक्षकांना बदलीच्या ठिकाणी न जाता त्या ठिकाणीच कार्यरत राहतील. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, अश्या आशयाची मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील सरकारी कार्यालये, सरकारी दवाखाना, बसेस वर मराठी भाषेत नामफलक लावण्यात यावे. जेणेकरून तालुक्यातील ग्रामीण भागातील मराठी भाषिकांची गैरसोय होणार नाही, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, सहचिटणीस रणजीत पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील, खजिनदार संजीव पाटील, गोपाळराव पाटील, पांडुरंग सावंत, प्रकाश चव्हाण, धनंजय पाटील, कृष्णा कुंभार, हणमंत मेलगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.