बेळगाव : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीची नोटीस कन्नड व इंग्रजी भाषेत असल्यामुळे मराठी भाषिक नगरसेवकांनी सदर नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर मराठी भाषिक नगरसेवकांच्या घरावर नोटीस चिकटविण्याचा प्रताप महानगरपालिकेने केला आहे. पालिकेच्या या कृतीमुळे मराठी भाषिक नगसेवकातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून मराठी भाषेतून नोटीस मिळेपर्यंत सभा होऊ न देण्याचा निर्धार मराठी भाषिक नगरसेवकांनी केला आहे.
बेळगाव महानगरपालिकेमध्ये बहुतांश नगरसेवक हे मराठी भाषिक असल्यामुळे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभेची नोटीस मराठी भाषेतून देण्याची मागणी मराठी नगरसेवकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी केली होती. तसा अर्ज देखील महापौर शोभा सोमनाचे यांना दिला होता. त्यावेळी महापौर शोभा सोमनाचे यांनी पुढील बैठकीची नोटीस कन्नड इंग्रजी व मराठी भाषेतून देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र सत्ताधारी नगरसेवकांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावत येत्या 16 ऑगस्टला होणाऱ्या पालिका सभेची नोटीस कन्नड व इंग्रजीमध्ये देण्यात आली. त्या नोटीस स्वीकारण्यास मराठी भाषिक नगरसेवकांनी नकार दिला होता त्यामुळे मराठी नगरसेवकांच्या घरावर कन्नड नोटीस चिकटविण्याचा प्रताप बेळगाव महानगरपालिकेने केलेला आहे. काल एका मराठी भाषिक नगरसेवकाच्या घरावर देखील बैठकीची कन्नड भाषेतील नोटीस चिकटविण्यात आली होती त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या घरावर देखील महानगरपालिकेने कन्नड भाषेची नोटीस टिकविण्याचा प्रताप केलेला आहे. मराठी नोटीस न दिल्याने समितीच्या नगरसेवकांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला होता बुधवारी होणाऱ्या बैठकीमुळे यावेळी जोरदार आवाज उठविण्याचा निर्णय समितीच्या नगरसेवकांनी घेतला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta