बेळगाव : वडगाव येथील पशुचिकित्सालयाचे स्थलांतर रद्द करण्याबरोबरच बळ्ळारी नाला स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी सुधारणा युवक मंडळ विष्णू गल्ली वडगाव यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. शेतकरी नेते राजू मरवे तसेच शेतकरी सुधारणा युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सदर मागणीचे निवेदन आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकाने निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
बेळगाव दक्षिण मतदार संघातील वडगाव, जुने बेळगाव, शहापूर या भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे वास्तव्य असल्याने हजारो जनावरे तसेच अनेक पाळीव प्राणी आहेत. त्यांच्या चिकित्सेसाठी वडगावमधील चावडी येथे महानगरपालिकेच्या जागेत मागील 15 ते 20 वर्षापासून शेतकरी व जनतेच्या मागणीने सरकारी पशुचिकित्सालय सुरू करण्यात आले होते. या चिकित्सालयाचा शेतकरी व जनतेला फायदा होत होता पण अलीकडे सदरी दवाखान्यात लाईटची सोय नसल्याने, जनावरांना वापरण्यासाठी काही औषधे ठेवण्यासाठी फ्रिजची व्यवस्था नसल्याने डॉक्टरांना येथे जनावरांवर उपचार करणे गैरसोयीचे होत आहे. सदर जागाही मनपाच्या अखत्यारीत येत असल्याने मनपाकडून लाईट घेण्याची परवानगी दिली जात नसल्याचेही समजते. या कारणास्तव पशुवैद्यकीय खाते पशु चिकित्सालय इतरत्र हलविण्याच्या तयारीत आहे. तसे झाल्यास वडगाव, जुने बेळगाव भागातील शेतकरी व पाळीव प्राणी पाळणाऱ्या जनतेला हे गैरसोयीचे होणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सदरी पशु चिकित्सालय इतरत्र स्थलांतरित न करता त्याच ठिकाणी ठेवून शेतकऱ्यांच्या जनावरांची तसेच पाळीव प्राणी पाळणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी जे अडथळे आहेत ते ताबडतोब दूर करून संबंधित खात्याची परवानगी घेऊन त्या जागेत सुसज्ज असे पशुचिकित्सालय बांधावे, अशी विनंती राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.
त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना तापदायक ठरलेला बळ्ळारी नाला साफ करून परिसरातील शेतकऱ्यांना पीक घेण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. सदर मागण्या पूर्ण न केल्यास या भागातील सर्व शेतकरी व जनता आपली जनावरे व पाळीव प्राण्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, इशारा देखील यावेळी देण्यात आला.
निवेदन सादर करतेवेळी राजू मरवे यांच्यासह आर. के. पाटील, एस. पी. पाखरे, एन. एन. जाधव, अमोल देसाई, नेताजी जाधव, ए. एन. सातेरी, संतोष चव्हाण, तवनाप्पा पाटील, शिवलीला मिसाळे आदीसह शेती सुधारणा युवक मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta