पोलीस आयुक्त डॉ. एस. एन. सिद्धरामप्पा यांची माहिती
बेळगाव : शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना येत्या गणेशोत्सवासाठी आवश्यक असणाऱ्या विविध खात्याची लेखी परवानगी मिळणे सोईस्कर होण्यासाठी गणेशोत्सवाच्या 15 दिवस अगोदर “एक खिडकी” सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन देण्यासोबत गणेशोत्सव शांततेत पार पाडवा यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांची तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील गणेशोत्सव मंडळांची संयुक्तिक बैठक घेण्यात येईल, असे शहर पोलीस आयुक्त डॉ. एस. एन. सिद्धरामप्पा यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेमध्ये बैठक झाली होती त्यानंतर आज मंगळवारी सकाळी पोलिस आयुक्त कार्यालयाच्या सभागृहामध्ये पोलीस अधिकारी आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ, लोकमान्य टिळक सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर पोलीस आयुक्त होते. प्रारंभी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस आयुक्त एस. टी. शेखर यांनी सर्वांचे स्वागत केले. बैठकीत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री गणेशोत्सव दरम्यान उद्भवणाऱ्या विविध समस्यांची माहिती दिली. त्यावेळी जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी “एक खिडकी” सुविधेचा मुद्दा उपस्थित केला. शहरात एकूण 378 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. गणेशोत्सव मंडळांच्या सोयीसाठी “एक खिडकी” सुविधा दिली जाते मात्र पोलीस खात्याव्यतिरिक्त हेस्कॉम, वनविभाग, महानगरपालिका तसेच अन्य विभागांचे अधिकारी त्या ठिकाणी गैरहजर असतात. गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी येणाऱ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी “एक खिडकी” सुविधेच्या ठिकाणी वेळेत उपस्थित राहतील अशी व्यवस्था करण्यात यावी. तसेच विविध परवानग्या मिळविण्याबाबत येणाऱ्या अडचणींबाबत अधिकाऱ्यांना माहिती द्यावी व परवानगी मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी तसेच गणेशोत्सव मंडळांवर कोणत्याही कठोर अटी लादण्यात येऊ नयेत त्याचप्रमाणे “एक खिडकी” सुविधा ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर सुरू न करता किमान 15 दिवस आधी सुरू करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर गणेश विसर्जन मार्ग हा आधीच ठरलेला असताना त्या मार्गात येणारे अडथळे तात्काळ दूर करण्यात यावे. या मार्गातील लोंबकळणाऱ्या विद्युत तारा तसेच झाडांच्या फांद्या गणेशोत्सव आधी काढण्यात याव्यात. जेणेकरून कोणतीही दुर्घटना होणार नाही, अशी मागणी यावेळी करण्यात आली. गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या या मागणीचा सकारात्मक विचार करत सिद्धरामप्पा यांनी पदाधिकाऱ्यांच्या मागण्यांना तात्काळ सहमती दर्शवत गणेशोत्सवाच्या पंधरा दिवस आधी शहरातील आठही पोलीस स्टेशनमध्ये “एक खिडकी” सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
गणेशोत्सव मंडळांना आवश्यक परवाना मिळविण्याबाबत कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. त्याशिवाय गणेशोत्सवा दरम्यान उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस हेस्कॉम व वनविभाग यांच्या समन्वय ठेवावा, असेही विकास कलघटगी यांनी सांगितले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकीमध्ये वेळेवर सहभागी व्हावे तसेच विसर्जन मिरवणुकीत खंड न पडता ती सलग पार पाडावी. त्याचबरोबर विसर्जन मिरवणुकी प्रसंगी डॉल्बीचा वापर केला जाऊ नये. डॉल्बी ऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यात यावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. सिद्धरामप्पा यांनी केले.
यावेळी बैठकीत मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, नगरसेवक गिरीश धोंगडी, नगरसेवक नितीन जाधव आदींनी आपल्या सूचना मांडल्या.
शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर प्रशासनाने कोणतीही दडपशाही करू नये. त्याचबरोबर गणेशोत्सव काळात तर गावाहून नागरिक गणेश दर्शनासाठी व खरेदीसाठी शहरात येतात त्यांच्या सोयीसाठी हॉटेल खानावळ व खाद्यपदार्थांचे स्टॉल रात्री उशिरापर्यंत चालू ठेवण्यास परवानगी दिली जावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. यांनी केलेल्या एकंदर सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन यावेळी पोलीस आयुक्त डॉक्टर एस एन सिद्धरामप्पा यांनी दिले.
यावेळी पोलीस आयुक्तांसह गुन्हे व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा व मार्केट उपविभागाचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांनी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
गणेशोत्सव काळात प्रत्येक मंडळाने रहदारीस अडथळा होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असेही यावेळी स्पष्ट केले. खडेबाजार उपविभागाचे एसीपी अरुण कुमार कोल्लूर, बेळगाव ग्रामीण उपविभागाचे एसीपी गिरीश, गुन्हे अन्वेषण शाखेचे एसीपी कट्टीमनी, खडेबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्यासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारी सचिव आनंद आपटेकर, उपाध्यक्ष सागर पाटील, सेक्रेटरी गणेश दड्डीकर, कपिल भोसले, माजी नगरसेवक राजू बिरजे, माजी उपमहापौर संजय शिंदे, हेमंत हावळ, सुनील जाधव, रोहित रावळ, अशोक चिंडक आदी पदाधिकारी व सदस्य बैठकीत उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta