
बेळगाव : गोकाक व अंकलगी परिसरासह कोल्हापूर जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्या दोघा आंतरराज्य चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून ८ लाख २५ हजार रुपये किमतीच्या २३ दुचाकी जप्त केल्या. यापैकी सुमारे १७ दुचाकी कोल्हापूर शहर व जिल्ह्यातून चोरल्याचे गोकाक पोलिसांनी सांगितले.
अटक केलेल्या संशयितांमध्ये संतोष रामचंद्र निशाने (३०, कळंबा, ता. करवीर जि. कोल्हापूर) व भरमाप्पा यल्लाप्पा कोप्पद (२१, तेळगीनहट्टी, ता. गोकाक ) यांचा समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोकाक शहर व ग्रामीण भागात तसेच अंकलगी परिसरातील दुचाकी चोरीला जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. २३ ऑगस्ट रोजी कुंदरगीतील लक्ष्मी मंदिरासमोरील पाश्चापूर- अंकलगी रस्त्यावर लावलेली दुचाकी चोरीला गेली होती. सदर दुचाकीचालकाने याबाबत अंकलगी पोलिसांत फिर्याद दिली होती. गोकाक व अंकलगी पोलिसांनी या चोरीचा सखोल तपास सुरु केला असता उपरोक्त दोघेजण सापडले. या दोघांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर शहर, करवीर, इचलकरंजी, हातकणगले तर कर्नाटकातील बेळगाव, गोकाक, अंकलगी, निपाणी, हक्केरी, संकेश्वर या परिसरातील दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे या चोरट्यांनी चोरलेल्या २३ पैकी १७ दुचाकी महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे, कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस खात्याला त्यांच्या भागातील चोरीला गेलेल्या दुचाकी सापडणार आहेत.
शिवाय सखोल चौकशीसाठी चोरट्यांचीही कोठडी घेता येणार आहे.
जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख एम. वेणुगोपाल, गोकाकचे उपाधीक्षक डी. एच. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली गोकाकचे पोलिस निरीक्षक गोपाळ राठोड, अंकलगीचे उपनिरीक्षक एच. डी. यरझरवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी याचा तपास केला. गोकाक व अंकलगी टीमचे पोलिस प्रमुखांनी कौतुक केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta