बेळगाव : वैश्यवाणी समाज बांधवांना मागासवर्गीय 2 डी अंतर्गत जातीचे प्रमाणपत्र दिले जावे, अशी मागणी वैश्यवाणी समाजातर्फे बेळगावच्या तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
बेळगाव शहरातील वैश्यवाणी समाज बांधवांतर्फे समाजाचे प्रमुख बापूसाहेब अनगोळकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज शनिवारी तहसीलदारांना सादर करण्यात आले.
निवेदनाचा स्वीकार करून तहसीलदारांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. मागील सरकारने मार्च अधिवेशनात आमच्या वैश्यवाणी जातीला मागास प्रवर्ग 2डी मध्ये वर्ग करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेश एक प्रत सोबत जोडली आहे. तथापी आमच्या जातीतील मुले, नोकरी इच्छूक मंडळी मागासवर्गीय प्रवर्ग 2डी अंतर्गत आमचे जात प्रमाणपत्र मागण्यासाठी गेल्यास त्यांना ते देण्यास नकार दिला जात आहे.
सरकारचा तसा आदेश आम्हाला मिळालेला नाही असे सांगून जात प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून आमच्या जातीतील मुलांना शाळेत प्रवेश घेण्यास, शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास उशीर होत आहे.
त्यामुळे वैश्यवाणी समाजातील मुले व नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांचे नुकसान होत आहे. तेंव्हा याची सहानुभूतीपूर्वक दखल घेऊन शासनाच्या आदेशानुसार आम्हा समाज बांधवांना मागासवर्गीय 2डी अंतर्गत वैश्यवाणी जातीचे प्रमाणपत्र द्यावे, ही नम्र विनंती असा आशयाचा तपशील निवेदनात नमुद आहे.
तहसीलदारांना निवेदन सादर करणाऱ्या वैश्यवाणी समाज बांधवांच्या शिष्टमंडळात बापूसाहेब अनगोळकर यांच्यासह विकास कलगटगी व इतरांचा समावेश होता.
Belgaum Varta Belgaum Varta