Saturday , December 13 2025
Breaking News

गणेशोत्सव, ईद सणांनिमित्त शांतता -नागरिक समितीची बैठक संपन्न

Spread the love

 

बेळगाव : आगामी श्री गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण शहरातील सर्व हिंदू व मुस्लिम बांधवांनी सौहार्दपूर्ण वातावरणात कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घेत ऐक्याने साजरे करावेत, असे आवाहन खडेबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी केले.

येत्या श्री गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता व नागरीक समितीची बैठक नुकतीच खडेबाजार पोलीस ठाण्यात पार पडली. याप्रसंगी पोलीस निरीक्षक निंबाळकर बोलत होते. येत्या गणेशोत्सव काळातच मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद सणाला आहे त्यामुळे हे सण हिंदू -मुस्लिम बांधवांनी सौहार्दपूर्ण वातावरणात ऐक्याने साजरे करावेत.

सणाच्या काळात प्रशासनाला सहकार्य करून शांतता भंग होणार नाही याची काळजी घेतली जावी. कोणत्याही वेळी गरज भासल्यास पोलिसांचे सहाय्य घ्यावे असे सांगून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जनहितार्थ कोणती खबरदारी घ्यावी याबाबत पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.

मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी यावेळी बोलताना महामंडळाकडून आगामी श्री गणेश उत्सवाची कशी तयारी केली जात आहे? काय नियोजन केले जात आहे? याची थोडक्यात माहिती दिली.

दोन्ही सण शांततेने सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करण्यासाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगून त्यासाठी काय अपेक्षित आहे याबद्दल आपले मत कलघटगी यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे शहराच्या संवेदनशील भागात काही सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे मंडप आहेत विशेष करून त्या ठिकाणच्या दोन्ही समाजाच्या कार्यकर्त्यांसह हिंदू -मुस्लिम बांधवांनी गुणागोविंदाने राहावे.

एकंदर आपण सर्वांनी बेळगाव शहराची आजवरची गेल्या अनेक वर्षाची बेळगावातील हिंदू -मुस्लिम ऐक्याची परंपरा यापुढेही कायम टिकवून ठेवूया असे विकास कलघटगी म्हणाले.

याप्रसंगी गणेशोत्सव महामंडळाचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, सतीश गोरगोंडा, मोहन कारेकर, भाऊ किल्लेकर, हाजीअली नुरानी, आयुब खान पठाण, समीउल्ला पठाण, महंमद साबीर शेख आदींनी देखील यावेळी आपापली मते मांडण्याबरोबरच कांही सूचना केल्या. बैठकीस देवेंद्र कांबळे, अमेय उघाडे, ए. के. धारवाडकर, वरदराज वैजन्नावर, निलेश रायबागकर, सुहास चौगुले, हबीब मदानी, अलिसाब मुजावर आदी शांतता व नागरिक समितीचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी पोलीस निरीक्षक सौदागर यांनी सर्वांचे स्वागत करून श्री गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सणाबाबत थोडक्यात माहिती दिली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगुंदी येथे शिक्षकाकडून विद्यार्थिनीशी अतिप्रसंग; गावकऱ्यांनी शिक्षकाला चोपले

Spread the love  बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील एका माध्यमिक शाळेच्या शिक्षकाने विद्यार्थिनीशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *