
बेळगाव : शहरातील काही गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात तंबाखूजन्य विमल गुटख्याच्या जाहिरातीचे फलक लावण्यात आले होते. ही बाब मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या निदर्शनास येताच महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सामंजस्यपणे विमल गुटख्याच्या जाहिरातीचे फलक हटविले व आपली चूक सुधारत संबंधित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव काळात व्यसनमुक्ती विरोधी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव महामंडळ आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतलेल्या या निर्णयाचे गणेश भक्तांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
महामंडळाने श्री गणेशोत्सव काळात विधायक कार्य करण्याचे आवाहन केले होते. मात्र शहरातील खडेबाजार, बसवाण गल्ली, कोनवाळ गल्ली आदी भागातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात तंबाखूजन्य विमल गुटख्याची जाहिरात बाजी करण्यात आली होती. मंदिरे, धार्मिक स्थळ आदी ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींचे फलक लावणे हे बेकायदेशीर आहे. कोटा अंतर्गत संबंधित मंडळांवर गुन्हा नोंद होऊ शकतो त्यामुळे संबंधित मंडळांनी श्री गणेश मंडळाच्या मंडपाबाहेर जाहिरातबाजी केल्याची माहिती मिळताच महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने संबंधित मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी चालविली होती. मात्र गणेश महामंडळाने हस्तक्षेप करून सदर कारवाई थांबविली व मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अनावधानाने सदर चूक झाली असल्याची व ती चूक तात्काळ सुधारली असल्याचे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना पटवून दिले. यादरम्यान गुटखा जाहिरातीचे प्रकरण सामंजस्याने हाताळून संबंधित मंडळांना योग्य मार्गदर्शन करणारे मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी व पदाधिकाऱ्यांसह घडल्या गोष्टीचा बाऊ न करता सामंजस्याने सहकार्याची भूमिका घेणारी संबंधित गणेशोत्सव मंडळे या सर्वांचे बेळगाव शहरात कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta