बेळगाव : कुन्नूर (तामिळनाडू) येथे हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू पावलेले देशाच्या तीनही संरक्षण दलाचे प्रमुख सीडीएस बिपीन रावत यांच्या स्मरणार्थ त्यांची हुबेहूब रांगोळी चितारून बेळगावचे सुप्रसिद्ध कलाकार अजित औरवाडकर यांनी रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
नाझर कॅम्प, वडगाव येथील आपल्या ज्योती फोटो स्टुडिओमध्ये विविध रंगाच्या रांगोळीचा सुरेख मिलाफ करून औरवाडकर यांनी अत्यंत कौशल्याने दिवंगत सीडीएस बिपीन रावत यांची लष्करी गणवेशातील जिवंत वाटावी अशी हुबेहूब रांगोळी रेखाटली आहे. सदर रांगोळी समोर मेणबत्त्या प्रज्वलित करून बिपीन रावत यांच्यासह हेलिकॉप्टरच्या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या रावत यांच्या पत्नी आणि सर्व अधिकार्यांना अजित औरवाडकर यांनी आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
