
बेळगाव : अकरा दिवस विराजमान झालेले गणराज आज भक्तांचा निरोप घेऊन जात आहेत. शहरात विसर्जन मिरवणूक नियोजित वेळेत सुरू झाली. कावेरी कोल्ड्रिंक जवळ मिरवणुकीचा शुभारंभ झाला. यावेळी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, आमदार असिफ सेठ, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, माजी परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलिस आयुक्त सिद्धरामप्पा, महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंडी, महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शहराचे मध्यवर्ती ठिकाण समजले जाणाऱ्या धर्मवीर संभाजी चौकात विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तांनी गर्दी केली आहे. यावर्षी अनेक गणेश मंडळांनी डीजे विरहित गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. अनेक मंडळांनी झांजपथक व ढोल ताशांना प्राधान्य दिले आहे. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या जयघोषात बाप्पांची विसर्जन मिरवणूक शिस्तबद्धरित्या निघालेली आहे. विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे. बेळगाव शहरात जवळपास दोन हजारहून अधिक पोलीस कुमक मागविण्यात आलेली आहे. विसर्जन मार्गावर सुमारे 30 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. तसेच आठ ड्रोनद्वारे विसर्जन मिरवणुकीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे.

कपिलेश्वर तलावासह बेळगावातील आठ भागात महानगरपालिकेने विसर्जनाची सोय केलेली आहे. घरगुती गणेश विसर्जना बरोबरच सार्वजनिक गणेश विसर्जन देखील जल्लोषात पार पडत आहे. बेळगाव शहरातील माळी गल्लीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे आज दुपारी सर्वात पहिल्यांदा विसर्जन करण्यात आले. त्यानंतर शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भक्तीभावाने आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” जयघोषात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देऊन भक्त पुन्हा पुढच्या वर्षीच्या आगमनासाठी सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta