
बेळगाव : उचगाव क्रॉस ते कोवाड रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता सीमा हद्दीत असल्यामुळे प्रशासनाचे या रस्त्याकडे नेहमीच दुर्लक्ष झालेले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील स्थानिक लोकप्रतिनिधींनी तसेच बांधकाम खात्याने या मागणीला केराची टोपली दाखवलेली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनीच आता चक्क भिक माग आंदोलन करत निधी जमा करण्याचे काम हाती घेतले आहे. या माध्यमातून जो निधी जमा होईल त्यातून हा अर्धा किलोमीटरचा रस्ता दुरुस्त करण्यात येणार आहे.

बेळगाव जवळील अतिवाड क्रॉस जवळ रस्ता पूर्णपणे उकडून गेलेला आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमा हद्दीवर रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नाही त्यामुळे आता प्रवाशांनीच रस्ता दुरुस्ती करण्यासाठी भीक माग आंदोलन हाती घेतले आहे. यानुसार या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांकडून पैसे मागितले जात आहेत. या आंदोलनानंतर तरी लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग येईल का हे पाहावे लागणार आहे. कोवाड, नेसरी, आजरा, गडहिंग्लज परिसरातील नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी ये-जा करण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर उचगाव भागातील काही गावांसाठी देखील हा रस्ता महत्त्वाचा आहे. मात्र सीमाभागातील या अर्ध्या किलोमीटर रस्त्याच्या डागडुजीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. दरम्यान प्रशासनाला जागे आणण्यासाठी काही वाहनधारकांनी पुढाकार घेत चक्क रस्त्यावरच भीक माग आंदोलन सुरू केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta