संजीवनी फौंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त व्याख्यान
बेळगाव : समाजात खूप काही चांगली कामे सुरु असतात, खूप जण समाज बदलासाठी प्रयत्न करत असतात, मात्र त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या कमी आहे. समाजात जे चांगले आहे, ते चांगले मानून त्यांना पाठिंबा द्या. संत तुकाराम यांनी शब्द हे शस्त्र आहेत, त्या शब्दांचा वापर चांगल्या कामांसाठी करा, असे संतसहित्यात सांगितले आहे, मात्र आता ही मानसिकता लोप पावत आहे, म्हणून अलिकडील काळात चांगुलपणा कमी होत आहे, असे मत समुपदेशक व व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्त केले.
येथील संजीवनी फौंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त रविवार दि. १ रोजी “जीवन सुंदर आहे” या विषयावर शिंदे यांनी व्याख्यान दिले. यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर स्वातंत्र्य सैनिक विठ्ठल याळगी, उद्योजक दिलिप चिटणीस, ज्येष्ठ तबला वादक बंडोपंत कुलकर्णी, फाऊंडेशनच्या संस्थापिका सविता देगीनाळ, सीईओ मदन बामणे होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
पुढे बोलताना गणेश शिंदे म्हणाले, कलियुगात नाती जपणे महत्वाचे आहे. मानवी जीवनात आभासी प्रेम वाढत आहे, मात्र जिव्हाळ्याचा स्पर्श आता नाहीसा होत आहे. आई-वडीलांच्या अखेरच्या टप्यात त्यांच्या मोठ्या मुलांचा स्पर्श खूप मोठी ताकद देतो.
ईशस्तवन बनुताई जोशी यांनी केले. सीईओ मदन बामणे यांनी प्रास्ताविक करुन स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय सुरेखा पोटे यांनी करुन दिला.
ज्येष्ठ सत्कारमूर्ती विठ्ठलराव याळगी, दिलीप चिटणीस आणि बंडोपंत कुलकर्णी यांचा शाल, फळांची टोकरी, स्मृतिचिन्ह देऊन संध्या देगीनाळ, रेखा बामणे, प्रिती चौगुले, पूजा पाटील, ज्योती अनगोळकर, डॉ. अनिल पोटे या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उमंग २०२३ अंतर्गत घेण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या गायन स्पर्धेत अनुक्रमे कृष्णा मरदूर, रविंद्र वामनाचार्य, सुभाष कलाल यांनी तर नृत्य स्पर्धेत अनुक्रमे प्रेमा उपाध्ये, वनिता जोशी, जया जोशी यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी समाजातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकमान्य रंगमंदिर खचाखच भरले होते. अनेकांनी उभे राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
सुत्रसंचालन मधुरा शिरोडकर यांनी केले. आभार डॉ. नविना शेट्टीगार यांनी मानले.