
बेळगाव : स्वच्छ भारत अभियांनातर्गत ‘ऑपरेशन मदत’ ग्रूप या संस्थेच्या सहकार्याने कॅन्टोन्मेंट शाळेने पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज आहे ओळखून, शाळेमध्ये प्लास्टिक मुक्तीचे अभियान सुरू केले आहे.

संपूर्ण जग हे दिवसेंदिवस प्लास्टिकच्या विळख्यात जखडले जात आहे. त्याच्या दुष्परिणामाची कल्पना विद्यार्थ्यांना बाल वयापासूनच व्हावी व पर्यावरण संवर्धनात विद्यार्थ्यांचाही सहभाग असावा यासाठी विद्यार्थ्यांना जगात सर्वत्र पसरलेल्या प्लास्टिक कचऱ्याविषयी पी.पी.टी. च्या माध्यमातून निर्माण झालेल्या भयावह परिणामांची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. आपल्या शाळेत व घरात कचरा स्वरूपात टाकले जाणारे प्लास्टिक संकलन करून त्याचा पुनर्वापर करता येतो याचे विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यात आले. जगात दरवर्षी जवळपास चार हजार टन प्लास्टिक कचरा तयार होतो. त्यापैकी जवळपास चौदाशे टन कचरा नदी नाल्यामार्फत वाहत जाऊन समुद्राला मिळतो. याच प्लास्टिकमुळे जलचरांच्या जीवाला हानी पोचत असून हेच समुद्री जीव खाल्याने नकळत मानवी जीवनाला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. टाकाऊ प्लास्टिकमुळे पृथ्वीवरील लाखो प्राणी, पक्षी मृत झाल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, याचीही कल्पना विद्यार्थ्यांना देण्यात आली.
प्लास्टिक मुक्त अभियानाचा पुढील टप्पा म्हणून विद्यार्थ्यांना आठवडाभर आपल्या घरी वापरले जाणारे वेस्ट प्लास्टिक, बाटल्यांमध्ये भरून शाळेत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला विद्यार्थी व पालकांनी उत्तम प्रतिसाद देत शाळेतील जवळपास सर्वच मुलांनी घरातील टाकावू प्लास्टिकचा कचरा एका बाटलीत भरून किमान एक, दोन तर काहींनी चार/पाच बाटल्या आणुन या अभियानात आपला सहभाग उस्फूर्तपणे दर्शविला. यावरून विद्यार्थ्यांनी हा विषय गांभीर्याने घेतल्याचे दिसून आले आहे.
जवळपास तब्बल 500 पेक्षा जास्त बाटल्यात प्लास्टिकचा कचरा जमा करून महानगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभाग अधिकाऱ्यांना शाळेच्या या अभियानाची माहिती देण्यात आली. कॕन्टोन्मेंट शाळेने सुरू केलेले हे प्लास्टिक मुक्तीचे अभियान हळूहळू बेळगांव व परिसरातील सर्वच शाळांमध्ये सुरू करणार असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक पी. एस. बिर्जे यांनी सांगितले व शेवटी प्लास्टिक मुक्तीची शपथ दिली, पर्यावरण स्नेही राहुल पाटील यांनी प्लास्टिकच्या पुनर्वापराविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. बेळगांव महानगरपालिकेचे सहाय्यक पर्यावरण अधिकारी प्रविणकुमार यांनी जमलेल्या बाटल्या बघून सर्वांचे कौतूक केले.
यावेळीच्या खास कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे मनोरंजक करण्यासाठी ‘ऑपरेशन मदत’ ग्रूपचे म्युझिशियन व्हिक्टर फ्रांसिस सर यांनी आपल्या गिटार वादनाने सर्वांनाच ताल धरायला लावला.
महानगरपालिकेचे पर्यावरण विभागाचे सहाय्यक अभियंते श्री. हणमंत कलादगी, हेल्थ इन्स्पेक्टर शिल्पा कुंभार, सॅनिटरी इन्स्पेक्टर शिवानंद भोसले, अनिल बोरगावी, शाळेचा शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमात शाळेने सुरू केलेल्या अभियानाचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले व बेळगांव महानगरपालिकेच्या वतीने या अभियानास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे सूतोवाच केले.
Belgaum Varta Belgaum Varta