
बेळगाव : वर्षभरापासून बंद पडलेली दिल्ली -बेळगांव विमानसेवा आता पुन्हा 5 ऑक्टोबर पासून नव्याने सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे बेळगाव ते मुंबई ही विमानसेवा येत्या 15 ऑक्टोबर पासून बेळगावकरांच्या सेवेत असणार आहे. इंडिगो विमान कंपनीने बेळगाव ते दिल्ली विमानसेवा सुरू केली असून या कंपनीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नवी दिल्ली ते बेळगाव विमान प्रवासाचा कालावधी हा 2 तास 20 मिनिटांचा असणार आहे. दिल्ली- बेळगाव विमान प्रवासासाठी 5294 रुपये तर बेळगाव ते दिल्लीसाठी 4719 रुपये तिकिटाची किंमत असणार आहे. 5 ऑक्टोबर पासून इंडिगो विमान दररोज दुपारी 3:45 वाजता नवी दिल्ली येथून प्रस्थान करेल आणि सायंकाळी 6:05 वाजता बेळगावला पोहोचेल तर बेळगावहून 6:35 वाजता प्रस्थान करून रात्री 9 वाजता नवी दिल्ली येथे पोहोचेल. यापूर्वी स्पाइस जेट कंपनीने बेळगाव ते दिल्ली विमानसेवा सुरू केली होती. मात्र काही तांत्रिक कारणे देत वर्षभरापूर्वी ही विमानसेवा बंद केली होती. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेत इंडिगो विमान कंपनीने ही विमानसेवा पुन्हा सुरू केली आहे. सदर विमान प्रवासाच्या तिकीट बुकिंगला देखील सुरुवात झाली असून प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नवी दिल्ली विमानसेवेबरोबर येत्या 15 ऑक्टोबर पासून स्टार कंपनीची बेळगाव ते मुंबई ही विमानसेवा दररोज सुरू होणार असून स्टार एअरची सध्या मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार अशी चार दिवस बेळगाव मुंबई विमानसेवा आहे. मात्र 15 ऑक्टोबर पासून ही विमानसेवा नियमित सुरू राहील. या विमानसेवेसाठी आधुनिक एम्ब्रेर-175 विमान आणि एम्ब्रेर -145 विमानाचा वापर करणार आहे. स्टार एअर बेळगाव ते मुंबई दरम्यान बिझनेस क्लास सेवा देण्यात येणार असून या विभागात एम्ब्रेर-175 चालविण्याची ही पहिलीच वेळ असेल सध्या बेळगाव विमानतळावरून मुंबई, इंदोर, अहमदाबाद, जयपुर, सुरत, बेंगलोर, तिरुपती, हैदराबाद, जोधपुर व कानपूर या शहरांना विमान सेवा सुरू आहे. आता या दिल्लीची भर पडणार आहे. काही दिवसातच पुण्याची विमानसेवा देखील सुरू करण्यात येणार आहे.
सुरळीत सुरू असलेली दिल्ली- बेळगाव विमानसेवा अचानक बंद पडल्यामुळे राजकीय नेते, उद्योजक, अधिकारी व व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. बेळगावमधून दिल्ली विमानसेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना हुबळी किंवा गोवा विमानतळ वाटावे लागत होते. बेळगाव ते दिल्ली विमानसेवा पूर्ववत सुरू होणार असल्यामुळे प्रवाशातून समाधान व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta