बेळगाव : खानापूर आणि बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्ज वसुली थांबवून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी आज नेगील योगी रयत संघटनेतर्फे करण्यात आली.
25 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करून खानापूर आणि बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी खानापूर तालुक्याला भेट देऊन पाहणी केली होती. मात्र प्रशासनाकडून यासंदर्भात कोणताच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे रयत संघटनेने 11 तारखेपर्यंतची प्रशासनाला डेडलाईन देऊन त्या कालावधीत तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन करू असे नेगील योगी रयत संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
पावसाअभावी संपूर्ण राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वेळेत पाऊस न पडल्यामुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार आपल्या गॅरंटी योजना पूर्ण करण्यात व्यस्त आहे तर विरोधी पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात मग्न आहे. याउलट अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आपल्या कुटुंबाची चिंता लागून राहिली आहे. शेतकऱ्यांच्या या परिस्थितीकडे सरकारने गांभीर्याने लक्ष घालून खानापूर व बेळगांव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून आंदोलन करण्यात येईल असा इशारा रयत संघटनेतर्फे देण्यात आला आहे.