बेळगाव : पॉलिटेक्निक कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी तीन टप्प्यात कौन्सिलिंग घेतले जाते. यावेळी मात्र घाईगडबडीने दोन टप्प्यांमध्ये कौन्सिलिंग घेण्यासाठी तंत्रशिक्षण बोर्डकडून हालचाली सुरू आहेत. यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असून तीन टप्प्यांतच कौन्सिलिंग घ्यावे, या मागणीसाठी बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे निदर्शने करण्यात आली. टिळकवाडी येथील आरपीडी कॉर्नर येथे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण विभागाचा निषेध नोंदविला. अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल लावण्यास विलंब झाला. यामुळे घाईगडबडीने दोन टप्प्यांत कौन्सिलिंग घेतले जाणार आहे. यामुळे मर्यादित विद्यार्थ्यांनाच इंजिनिअरिंगला प्रवेश घेता येणार आहे. यामुळे अभाविपतर्फे निदर्शने करून निर्णय मागे घेण्यासाठी परीक्षा प्राधिकरण तसेच तंत्रशिक्षण बोर्डविरोधात निदर्शने केली. परीक्षा प्राधिकरण विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करत आहे. पीजीसीईटीप्रमाणेच डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी नियमाप्रमाणे तीन टप्प्यांत कौन्सिलिंग घेणे गरजेचे आहे. मात्र, घाईगडबडीने दोन टप्प्यांत कौन्सिलिंग घेऊन इंजिनिअरिंगच्या उर्वरित जागांबाबत काळाबाजार करण्याचा तर विचार नाही ना? अशी शंका यावेळी निदर्शकांनी व्यक्त केली. राज्य सरकारने विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य न केल्यास लवकरच सुवर्णसौधवर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.