
बेळगाव : यंदाचा कित्तूर उत्सव 23 ऑक्टोबरपासून तीन दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत कित्तूर येथे पूर्वतयारी बैठक झाली. उत्सवासाठी किमान 3 कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. तीन दिवसांच्या उत्सवासाठी किमान 3 कोटी रुपयांची गरज आहे. 5 कोटी रुपये अनुदानासाठी प्रस्ताव पाठविला आहे. पुढील उत्सवापर्यंत बांधकाम खात्यातर्फे कित्तूरच्या विकासासाठी 5 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या निधीचा वापर करून कित्तूर येथे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमांचे अनावरण करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

म्हैसूर दसऱ्याच्या धर्तीवर कित्तूर उत्सव साजरा व्हावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. या उत्सवात स्थानिक कलाकारांना प्राधान्य द्यावे, अशी अधिकाऱ्यांना सूचना करतानाच पुढील वर्षापासून कित्तूरच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे छायाचित्र प्रदर्शन सुरू करण्यात येणार आहे. कित्तूर हे पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी, शौचालयांच्या निर्मितीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे 50 शौचालयांची निर्मिती करण्यात येणार असून स्थानिकांनी यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. लघुपाटबंधारे खात्यातर्फे रणगट्टी तलावाचा विकास केला जाणार आहे.
स्थानिक पात्र कलाकारांना उत्सवात प्राधान्य द्यावे, उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वजण एकत्र येऊन काम करावे. कित्तूरच्या विकासासाठी आतापर्यंत भरपूर अनुदान खर्च केले आहे. तरीही अपेक्षित सुधारणा झाली नाही. राणी चन्नम्मांचे जन्मस्थळ ही खासगी जागा आहे. त्यामुळे त्याचा विकास घडविण्यात अडचण आली आहे, असेही सतीश जारकीहोळी यांनी बैठकीत सांगितले. कित्तूर राजगुरु कलमठचे श्री मडिवाळ राजयोगिंद्र स्वामीजी यांनी कित्तूर किल्ल्याच्या तटबंदीच्या दुरुस्तीचा सल्ला देतानाच उत्सवासाठी प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहन केले. आमदार बाबासाहेब पाटील यांनी किल्ल्याच्या आवारात किमान आठवड्यातून दोन वेळा आधुनिक तंत्राद्वारे राणी चन्नम्मांचा इतिहास दाखविण्यात येणार असल्याचे सांगितले.
5 कोटीच्या अनुदानासाठी सरकारला प्रस्ताव
उत्सवासाठी 5 कोटी रुपये अनुदान देण्यासंबंधी सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. कित्तूर उत्सवाच्या यशस्वितेसाठी अधिकारी व नागरिकांचा समावेश असलेल्या 16 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. दरवर्षीप्रमाणेच यंदाही कुस्ती, सायकलिंग, क्रीडा स्पर्धांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, कन्नड व सांस्कृतिक खात्याच्या विद्यावती बजंत्री व कित्तूर येथील विविध संघटनांचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. प्रांताधिकारी प्रभावती फकिरपूर यांनी स्वागत केले.
Belgaum Varta Belgaum Varta