बेळगाव : घरातील मंडळी परगावी लग्नासाठी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी काल रात्री घराचा दरवाजा फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अशा सुमारे 12 लाख रुपयांच्या ऐवजाची धाडसी चोरी केल्याची घटना तारीहाळ गावात आज सकाळी उघडकीस आली.
तारीहाळ (ता. जि. बेळगाव) गावातील श्री अय्यप्पा स्वामी मंदिरानजीक असणार्या पांडू कल्लाप्पा खणगांवकर ज्यांच्या घरात हा चोरीचा प्रकार घडला आहे. स्वत: पांडू वगळता सर्व खणगांवकर कुटुंबीय काल शुक्रवारी लग्नकार्यासाठी परगावी सुळेभावीला गेले होते.
घरी असलेले पांडू खणगांवकर रात्री श्री अय्यप्पा स्वामी मंदिरात झोपण्यासाठी गेले होते. ही संधी साधून चोरट्याने खणगांवकर्यांच्या घराच्या मागील दरवाजा कडीकोयंडाच्या जागी फोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील बेडरूममधील कपाट फोडून त्यातील 15 तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख 5 लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले.
मंदिरात झोपलेले पांडू आज सकाळी आपल्या घरात गेले असता चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. भरवस्तीत झालेल्या या धाडसी चोरीची बातमी वार्यासारखी गावात पसरताच खणगांवकर यांच्या घरासमोर बघ्यांची गर्दी झाली होती.
चोरीच्या प्रकाराची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पंचनामा करून घटनास्थळी ठसे तज्ञ आणि पोलीस श्वानपथकाला पाचारण करण्यात आले.
श्वानपथक घटनास्थळापासून कांही अंतरावर जाऊन तेथेच घुटमळले. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
Check Also
बेळगाव तहसीलदार कार्यालयात कारकूनाची आत्महत्या
Spread the love बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयात उपविभागीय कारकूनाची तहसीलदार कार्यालयात चक्क तहसीलदार कक्षातच …