सुदैवाने जीवितहानी नाही : ट्रकसह ऊसाचे नुकसान
निपाणी : राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका संपता संपत नाही आहे. काल रात्री साडे बारा ते एकच्या दरम्यान निपाणी राष्ट्रीय महामार्गावरील अमर हॉटेल शेजारी ऊसाचा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात वाहनाचे प्रचंड नुकसान झालेले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा ऊस वहातुक करणारा ट्रक बेळगावहून निपाणी येथील हालसिद्धनाथ साखर कारखान्यास येत असता निपाणी राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल अमरजवळ येताच ट्रकचा पुढील बाजूचा टायर फुटल्यामुळे सदरचा अपघात झाल्याचे समजते. निपाणी राष्ट्रीय महामार्गावरील अमर हॉटेल शेजारी ऊसाचा ट्रक पलटी झाल्याचे वृत्त समजताच पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जय हिंद पेट्रोलिंगच्या कर्मचार्यांच्या सहकार्याने अपघातग्रस्त वाहनातील ऊस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
साखर कारखान्याची धुरांडी पेटल्यानंतर ती थंड होईपर्यंत असे अपघात दरवर्षी होतच असतात. पण वाहनधारक व साखर कारखान्यांनी ऊस वाहतूक करताना कोणते व कसे नियम पाळावेत याबाबतीत विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण ऊस वाहतूक करणार्या कोणत्याही वाहनांच्या पाठीमागे कापडी किंवा रेडियम रिफ्लेक्टर नसल्यामुळे व प्रत्येक वाहनातील ऊस वाहनांच्या बाहेरील बाजूस येत असल्यामुळे वाहनाची नंबर प्लेट देखील दिसत नाही. व वाहन समोर आल्यानंतर मागिल वाहनधारकांची तारांबळ देखील उडते. त्यामुळे देखील बरेच अपघात महामार्गावर होत असल्याचे जाणवते.
