
कोतवाल कुटुंबीयांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव (वार्ता) : भाग्यनगर येथील (सीटीएम नं. ३८६९) सातवा क्रॉसमधील जागेवर अनगोळ येथील कोतवाल कुटुंबीय आणि मुस्लीम जमातने आपला हक्क सांगितला आहे. कुरूंदवाड सरकारने इनाम स्वरुपात ही जागा १४१८ मध्ये दिल्याचे कोतवाल कुटुंबीय आणि जमातचे म्हणणे आहे. तसेच यापूर्वी या जागेचा वापर कब्रस्तानसाठी करण्यात आला असून जागेच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत बांधण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले. आपले पूर्वज, अनगोळ तलाठी कार्यालयात तळवारकीचे काम करीत होते. त्यामुळे त्यांना ‘तळवार’ म्हणूनही ओळखले जायचे. कुरूंदवाड सरकारने इनाम स्वरुपात त्यांना आर. एस. एन. ४७१४ मधील ३१ गुंठे जमीन दिली होती. त्यातील १९ गुंठे जागेत अनगोळ माळ (सध्याच्या भाग्यनगर सातवा क्रॉस) येथील कब्रस्तान आहे. यामुळे या जागेचे तळवार ऊर्फ कोतवाल कुटुंबीय मूळ मालक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
भाग्यनगर येथील रहिवाशांनी या जागेवर उद्यानाची निर्मिती करावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र ही मागणी नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकणारी आहे. यासाठी या जागेच्या संरक्षणासाठी संरक्षक भिंत उभारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी ऍड. आय. एम. कोतवाल, जमातचे अध्यक्ष लियाकत जागिरदार, पापा कोतवाल, वासिम कोतवाल यांच्यासह अन्य नागरिकांच्यावतीने हे निवेदन देण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta