
जिल्हाधिकारी नितेश पाटील; साखर कारखाना पदाधिकारी एमडींची बैठक
बेळगाव (वार्ता) : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 1 नोव्हेंबरनंतरच ऊस गाळप सुरू करावे. सर्व कारखान्यांनी शासन आदेशाचे पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कारखान्यांना दिल्या. 2023-24 चा ऊस तोडणी हंगाम सुरू होण्यासंदर्भात शनिवारी (7 ऑगस्ट) शहरातील एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट येथे साखर कारखान्यांचे मालक, व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.
शेतकऱ्यांना एफआरपी दराने दिलेली रक्कम आणि एच अँड टी रक्कम कारखान्याच्या सूचना फलकावर लावावी. याची माहिती ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना द्यावी व ऊस वजन यंत्रामध्ये पारदर्शक यंत्रणा कार्यान्वित करावी. रिकव्हरी सॅम्पल मशीन बसवून शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
साखर कारखान्यांना अनपेक्षितपणे भेट देऊन वजन व वसुलीची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरावर एक पथक तयार करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
शेतकरी नेत्यांशी चर्चा करून भाव जाहीर केल्यानंतर सरकारने एफ.आर.पी. विनिर्दिष्ट वेळेत पेमेंट करावे. साखर नियंत्रण आदेशाचे सक्तीने पालन करावे, अशा सूचना त्यांनी साखर कारखानदारांना दिल्या.
यावेळी दुष्काळ जाहीर केल्याने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन साखर कारखानदारांनी एफ.आर.पी. भावाव्यतिरिक्त भाव ठरवून द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शेतकऱ्यांच्या वतीने कारखान्यांना केले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.भीमाशंकर गुळेद, आय.ए.एस. अधिकारी शुभम शुक्ला, अन्न, नागरी पुरवठा विभागाचे सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी सहाय्यक नियंत्रक वजनमापे विभाग, सहकार विभाग, जिल्हा पर्यावरण खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta