
तज्ञ समितीच्या बैठकीत निर्णय
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महाराष्ट्रातून शिष्टमंडळ पाठविणे,
उच्चाधिकार समितीची तात्काळ बैठक घेणे, त्याचबरोबर सीमाभागातील जनतेला मोफत आरोग्य सेवा देण्याबाबतचे महत्वपूर्ण निर्णय बुधवारी मुंबई येथे झालेल्या तज्ञ समितीच्या बैठकीत घेण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तज्ञ समिती अध्यक्ष खासदार धैर्यशील माने होते.
सीमाभागातील 865 गावातील मराठी जनतेला महाराष्ट्रात मोफत आरोग्य सेवा देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिफारस पत्र घेऊन येणाऱ्या सीमावासीयांना महाराष्ट्रात मोफत उपचार करण्यात येतील असे आजच्या तज्ञ समिती ठरले असून या निर्णयाची तात्काळ दखल घ्यावी असे आदेश तज्ञ समिती अध्यक्ष खासदार माने यांनी बजावले आहेत. त्याचबरोबर आसाम- मेघालयच्या धरतीवर महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्यात यावा या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यानुसार येत्या आठ दिवसात महाराष्ट्रातून एक शिष्टमंडळ दिल्लीला पंतप्रधानांच्या भेटीसाठी जाणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्च अधिकार समितीची बैठक घेऊन न्यायालयीन कामकाजामध्ये अडथळे दूर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि महाराष्ट्रातील विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लवकर चंदगड येथे प्रांतदर्जाचा अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तज्ञ समितीला सीमाभागातील माहिती मिळवून देण्यासाठी आणि इतर माहितीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते ऍड. एम. जी. पाटील आणि ऍड. महेश बिर्जे यांची तज्ञ समिती सल्लागार पदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर तज्ञ समितीच्या निमंत्रिकात आणखीन काही नावे जोडण्यात येतील अशी ग्वाही देखील यावेळी खासदार माने यांनी दिली. बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, दिनेश ओऊळकर, प्रकाश मरगाळे, ऍड. एम. जी. पाटील, ऍड. महेश बिर्जे, रमाकांत कोंडुसकर, संतोष काकडे, विकास कलघटगी, आनंद आपटेकर, कपिल भोसले, सागर पाटील, उदय पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta