
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक मराठी विद्यानिकेतन येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये 23 व्या मराठी बालसाहित्य संमेलनाची रूपरेषा ठरविण्यात आली. प्रथमतः प्रबोधनीचे अध्यक्ष श्री. जयंत नार्वेकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. बैठकीच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला. यानंतर गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बाल साहित्य संमेलनाची रूपरेषा ठरविण्यात आली. दिनांक 18 नोव्हेंबर रोजी 23 वे मराठी बालसाहित्य संमेलन घेण्याचे निश्चित झाले. या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून भाऊराव काकतकर महाविद्यालयचे मराठी विभागाचे प्राध्यापक व लेखक डॉ. डी. टी. पाटील यांची निवड करण्यात आली व उद्घाटक म्हणून बेळगाव मधील व सध्या मुंबई येथे स्थायिक असलेले श्री. सुरेंद्र कामत यांची निवड करण्यात आली. या साहित्य संमेलनामध्ये कथाकथन, कवी संमेलन व बालगीतांची संगीत मैफील अशा विविध सत्रांचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कथाकथन स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. त्याचबरोबर कवी संमेलनासाठी स्वरचित कविताही विद्यार्थ्यांनी पाठवायच्या आहेत. या संदर्भातले निवेदन लवकरच सीमा भागातील शाळांना पाठवले जाईल. प्रबोधिनीचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने हे साहित्य संमेलन उत्साहाने पार पडावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.. या बैठकी वेळीच प्रबोधिनीचे चिटणीस श्री. सुभाष ओळकर यांना त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. श्री. जयंती नार्वेकर व मालोजी अष्टेकर यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली. बैठकीला अध्यक्ष जयंत नार्वेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, चिटणीस श्री. सुभाष ओऊळकर, मालोजी अष्टेकर, सुरेश गडकरी, प्रा. सुभाष सुठंणकर, विजय बोंगाळे, नीला आपटे, इंद्रजीत मोरे, नारायण उडकेकर, गजानन सावंत, प्रसाद सावंत, हर्षदा सुंठणकर उपस्थित होते. आभार धीरजसिंह राजपूत यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta