
बेळगाव (प्रतिनिधी) : पिस्तुलचा धाक दाखवून फिल्मी स्टाईलने ज्वेलर्सचे दुकान लुटण्याचा प्रयत्न आज सोमवारी सकाळी शाहूनगर येथे घडला. या घटनेची परिसरात एकाच चर्चा सुरु आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार शाहुनगर येथील प्रशांत होनराव यांच्या मालकीच्या संतोषी ज्वेलर्स या दुकानात शिरून दोन अज्ञातांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना अडविण्याच्या प्रयत्नात दुकान मालक आणि त्या अज्ञातांमध्ये झटापट झाली. यावेळी यानंतर प्रशांत यांच्या डोक्यावर वार करून त्या दोघा अज्ञातांनी तेथून पळ काढला.
या घटनेनंतर शहर पोलिस आयुक्त एस.एन. सिद्धरामप्पा यांनी एपीएमसी पोलिस कर्मचाऱ्यांसह यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रसार माध्यमांना माहिती देताना ते म्हणाले, नेहमीप्रमाणे सकाळी संतोषी ज्वेलर्सचे दुकान उघडल्यानंतर साफसफाई सुरु होती. यावेळी दोन अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांनी मालक प्रशांत होनराव यांना पिस्तुलचा धाक दाखवून दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रशांत यांच्याशी त्यांची झटापट झाली. या झटापटीत दुकान मालक प्रशांत यांच्या डोक्यावर वार केल्याने त्यांना दुखापत झाली. यानंतर अज्ञातांनी तेथून पलायन केले. आरोपींची माहिती मिळाली असून लवकरच अटक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी पोलिस उपायुक्त रोहन जगदीश, पी.व्ही. स्नेहा आदि उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta