बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावातील श्री कलमेश्वर मंदिर येथे चौकट पूजन कार्यक्रम होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावातील गल्लीतून सोमवारी सकाळी लाकडी चौकटीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला कलमेश्वर गल्ली येथून मान्यवरांच्या हस्ते पूजन करून प्रारंभ झाला. यावेळी सुशोभित वाहनात श्री कलमेश्वर मंदिराची लाकडी सागवानी चौकट ठेवण्यात आली होती. ब्रम्हालिंग गल्ली, लक्ष्मी गल्ली, हनुमान नगर, मोरे गल्ली, शिवाजी महाराज चौक, इंदिरानगर येथून कलमेश्वर मंदिर येथे या मिरवणुकीची दुपारी सांगता झाली.
मिरवणुकीच्या अग्रभागी असलेल्या गावातील युवकांच्या उत्साह व डोकीवर कलश घेऊन सहभागी झालेल्या महिलांमुळे ही मिरवणूक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. मिरवणुकीमध्ये गावातील आजी-माजी पंचमंडळींसह जीर्णोद्धार कमिटीचे सदस्य, बालगोपाळ, युवा वर्ग आणि नागरिकांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. श्री कलमेश्वर मंदिर मिरवणुकीचे आगमन झाल्यानंतर पुरोहितांकडून सागवानी चौकटीचे पूजन करून शास्त्रोक्त पद्धतीने जलाभिषेक घातला गेला. दरम्यान, गावातील हे एक 400 वर्षांपूर्वी प्राचीन जुने जागृत देवस्थान आहे, अशी माहिती ग्राम पंचायात सदस्य संदीप अष्टेकर यांनी दिली. यावेळी वसंत अष्टेकर, विष्णू मोरे, कल्लाप्पा अष्टेकर, श्रीरंग भाष्कळ, दामु मोरे, भाऊ बेर्डे, जोतीबा मोरे आदी उपस्थित होते.