
बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्यात राजकीय युद्ध सुरूच आहे. हे युद्ध दोन नेत्यांमधील राजकीय युद्ध नसून, हे बेळगाव जिल्ह्याचे राजकीय विश्वयुद्ध आहे, यात शंका नाही.
स्मार्ट सिटी, बुडा जमीन वाटप, महानगरपालिकेमध्ये आमदार अभय पाटील यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप मंत्री सतीश जारकीहोळी आणि त्यांच्या समर्थकांनी केला असून, तुमचेच सरकार हवे असेल तर चौकशी करून दोषींवर कारवाई करा, असे आमदार अभय पाटील यांचे उत्तर आहे.
बेळगाव महानगरपालिकेत भाजपने घेतलेल्या करवाढीच्या निर्णयाचा विपर्यास करून महापालिका आयुक्तांनी शासनाला चुकीची माहिती दिली आहे.
महापालिकेतील वादामुळे महापौर शोभा सोमनाचे यांनी सतीश जारकीहोळी हे महापालिकेत हस्तक्षेप करून मला त्रास देत असल्याची तक्रार राज्यपालांना पत्र लिहून केली आहे. महापौर शोभा सोमनाचे यांनीही करवाढीच्या ठरावावर स्वाक्षरी केली असून त्यात छेडछाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. महापौरांनी स्वाक्षरी केलेली मूळ फाईल मनपातून गहाळ झाल्याची तक्रार महापालिकेच्या परिषद सचिवांनी पोलिसांकडे केली आहे.
महापौर आज राज्यपालांची भेट घेणार
बेळगावच्या महापौर शोभा सोमनाचे यांनी सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात राज्यपालांकडे केलेल्या तक्रारीनंतर राज्यपाल आज बेळगावात विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटी येथे होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येत असून महापौर शोभा सोमनाचे या राज्यपालांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याची माहिती आहे.
Belgaum Varta Belgaum Varta