बेळगाव : महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई, चंद्रकांत दादा पाटील, दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव शहर आणि जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातल्याचा आदेश बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बजावला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितिच्या 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काळ्यादिनी सहभागी होण्यासाठी तीन मंत्री आणि खासदार येण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश बजावला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते २ नोव्हेंबर सायंकाळ पर्यंत हा प्रवेश बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
एक नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समिती काळादिन पाळून रॅली काढून नंतर मराठा मंदिर येथे सभा आयोजित करणार आहे. काळादिन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई, चंद्रकांत दादा पाटील, दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने येणार असल्याची शक्यता आहे. त्यांच्या भाषणामुळे कन्नड आणि मराठी भाषिकात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. या मंत्र्यांना आणि खासदारांना कन्नड संघटनेचे कार्यकर्ते घेराव घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाषिक तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवण्याची शक्यता आहे. त्या बरोबर सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्री शंभूराज देसाई, चंद्रकांत दादा पाटील, दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव शहरात आणि जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे.