बेळगाव : महापालिकेला अमृत योजनेंतर्गत मिळालेल्या ८ कोटी रुपयांचा निधीबाबत अंतिमक्षणी माहिती देऊन निधी ११ रोजी परत जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने महापालिकेत एकच गोंधळ उडाला आहे. हा निधी परत जाऊ नये, यासाठी महापौर शोभा सोमनाचे यांनी सोमवारी (दि. ६) विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे.
शहरातील रस्ते, गटार उभारणी, पाणीपुरवठा याबाबत केंद्र सरकारकडून महापालिकेला ८ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. पण, याबाबत अधिकाऱ्यांनी महापौर आणि नगरसेवकांना कल्पना दिलेली नव्हती. गुरुवारी या निधीबाबत अधिकाऱ्यांनी माहिती देताना कृती आराखडा न केल्यास हा निधी ११ नोव्हेंबर रोजी परत जाणार असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांच्या या वागण्याबाबत तीव्र संताप व्यक्त करत नगरसेवकांनी लवकरात लवकर सर्वसाधारण सभा घेऊन कामांचा कृती आराखडा तयार करण्याबाबत मागणी केली. त्यानुसार महापौर सोमनाचे यांनी सोमवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली आहे. महापालिका सभागृह अस्तित्वात आल्यापासून नगरसेवक अधिकाऱ्यांकडे निधीबाबत विचारणा करत आहेत. पण, त्यांना सरकारकडून निधी आला नाही. आधी प्रत्येक प्रभागाला ४० लाख रुपयांपर्यंत निधी मिळेल, असे सांगितले होते. पण, त्यानंतरच्या सभांत केवळ २७ लाख रुपयेच मिळणार असल्याचे सांगितले. पण, केंद्र सरकारकडून आलेल्या आठ कोटी निधीबाबत कधीही वाच्चता करण्यात आली नाही. गुरुवारी सकाळी याबाबत अधिकाऱ्यांनी महापौरांना माहिती दिली.