बेळगाव : मुतगे येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून शुक्रवारपासून शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. जोपर्यंत या संघाची चौकशी होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, असा शेतकऱ्यांनी पवित्रा घेतल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते चंद्रकांत कोंडूस्कर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला.
पंधरा दिवसांपूर्वी संघाच्या सभासद शेतकऱ्यांनी डीसीसी बँकेचे अधिकारी व एआर डीआरना निवेदन देऊन संस्थेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करून चौकशी करण्याची मागणी केली होती. संघाचे 2011 पासून ते 2023 पर्यंत एकदाही सरकारी ऑडिट झालेले नाही. यावर्षीही बॅलेन्स शीट व ऑडिट रिपोर्ट नसताना सभासदांना अंधारात ठेवून वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली आहे. तसेच शून्य टक्के व्याजदराने सरकारकडून मिळणारे कर्ज न देता संघातील रक्कम कर्ज म्हणून वितरण केलेले आहे. त्यामुळे शेतकरी शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा संचालक मंडळाने खुलासा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेऊन अधिकारी संघामध्ये आले असता त्या ठिकाणी संचालक मंडळ उपस्थित नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तर अधिकाऱ्यांनी सेक्रेटरीकडे कागदपत्रे दाखविण्याची मागणी केली असता ते दाखवू शकले नाहीत. त्यामुळे संघामध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय बळावल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या सभासदांनी संघाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले आहे. शुक्रवारपासून शेतकऱ्यांनी सदर आंदोलन छेडले आहे. मात्र अपवाद चेअरमन किंवा संचालक मंडळ संघाकडे फिरकले नसल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. या आंदोलनामध्ये नामदेव पाटील, जोतिबा केदार, तुकाराम पाटील, सिद्धाप्पा पाटील, फोंडू पाटील, यल्लाप्पा कणबरकर, सचिन पाटील, भाऊबली धरमु, बाबू बस्तवाड, आप्पाना बस्तवाड, भावकांना पाटील, सयाजी पाटील, शंकर पाटील, उमेश पुरी, जयसिंग पाटीलसह शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत.
युवा शेतकऱ्याचे आमरण उपोषण…
यातील सचिन पाटील या युवा शेतकऱ्याने शुक्रवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांनी अन्न व पाण्याचा त्याग केला आहे व जोपर्यंत या संघाची चौकशी होत नाही व संचालक मंडळ याबाबत खुलासा करत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्यामुळे सदर आंदोलन आणखीन चिघळण्याची शक्यता आहे. मारिहाळ पोलीस घटनास्थळी परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta