विधान परिषद अध्यक्ष बसवराज होरट्टी यांचा गौप्यस्फोट
बेळगाव : कर्नाटक सरकारने हलगा येथे बांधलेल्या सुवर्णसौधच्या बांधकामाचा आराखडा चुकीचा असल्याचा गौप्यस्फोट विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
पुढील महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीची माहिती घेण्यासाठी बसवराज होरट्टी यांनी आज सुवर्णसौधला भेट दिली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना होरट्टी म्हणाले, सुवर्णसौध बांधकामावेळी त्या वेळचे मंत्री आणि अभियंत्यांनी निष्काळजीपणा दाखविला आहे. त्यामुळेच सुवर्णसौधच्या बांधकामात अनेक चुका दिसत आहेत. अनेक ठिकाणी छताला गळतीही लागली आहे. यातून बांधकामाचा आराखडा चुकीचा असल्याचे स्पष्ट होते असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सुवर्णसौध भाड्याने दिले जाणार नाही. मात्र, येथील सेंट्रल हॉल विशेष परिषदांसाठी भाड्याने देण्याबाबत प्राथमिक स्वरूपात चर्चा झाली आहे. नजीकच्या काळात सुवर्णसौध परिसरात आमदार निवासही बांधले जाईल. प्रत्येक मजल्यावर महत्त्वाच्या खात्यांचे कायमस्वरूपी कार्यालय सुरू राहावे यासंदर्भातही प्रयत्न सुरू आहेत.
बेळगाव होणारे हिवाळी अधिवेशन प्रत्येक वर्षी आंदोलनांनीच गाजत असते. आंदोलनामुळे सभागृहातील कामकाजावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. आमदारांना बेळगावचे अधिवेशन म्हणजे आंदोलन असेच वाटत आहे. त्यामुळे यावर्षी अधिवेशनादरम्यान आंदोलनांची संख्या कमी व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. आंदोलनकर्त्यांशी अधिवेशनात पूर्वीच अधिकाऱ्यांनी चर्चा करून त्यांच्या समस्या दूर करण्याबाबत प्रयत्न करावेत अशी सूचना संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत असेही होरट्टी यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta