बेळगाव : बेळगावातील गोवावेस बसवेश्वर सर्कलजवळ खाऊ कट्टा येथील दुकान वितरण आणि नाल्यालगतच्या इमारतीच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी खाऊ कट्टा येथील प्रत्येक दुकानाची पाहणी करून चौकशी केली.
सार्वजनिक बांधकाम विभाग बेंगळुरू दक्षिणचे मुख्य अभियंता दुर्गाप्पा यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय पथकाने आज खाऊ कट्ट्याला भेट देऊन माहिती जमा केली.
बेळगावातील गोवावेस बसवेश्वर सर्कलजवळ महापालिकेने उभारलेली खाऊ कट्टा ही इमारत अशास्त्रीय आहे. नाला किंवा नदी ज्या ठिकाणाहून वाहते त्या ठिकाणापासून विशिष्ट अंतरावर बांधकाम केलेले असावे, असा नियम असतानाही बेकायदेशीरपणे ही इमारत बांधली आहे असा आरोप आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या या इमारतीत विधवा, गोरगरीब, दलित आणि कर भरू न शकणाऱ्या गोरगरिबांना दुकाने द्यावीत, असा कायदा असतानाही येथील सर्व दुकाने भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचा आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आणि आरोप आणि तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी येथील प्रत्येक दुकानाची आज पाहणी केली. यातील एक दुकान खाऊ कट्ट्याची इमारत बांधणाऱ्या ठेकेदाराच्या पत्नीच्या नावावरही आहे. ते कोणत्या आधारावर वाटप करण्यात आले आहे. शासनाने बांधलेल्या या इमारतीला शासनाचे नाव असावे. स्थानिक आमदार अभय पाटील यांच्या नावाच्या फलकावर सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. यातील सत्य बाहेर काढण्यासाठी त्यांनी नुकताच मोठे आंदोलन करून जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे तक्रार केली होती.