बेळगाव : मच्छे येथे घडलेल्या खून प्रकरणातील संशयिताला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. महेंद्र राजू तळवार (वय १९ रा. गंगा गल्ली, मच्छे) असे जामीन मिळालेल्या संशयिताचे नाव आहे. मयत प्रतीक एकनाथ लोहार (रा. अनगोळ) आणि या खून प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण उर्फ छोट्या बाबू बळगण्णावर यांच्यामध्ये क्रिकेटवरून वाद झाला. त्यानंतर हा खून झाला होता.
क्रिकेट मॅच झाल्यानंतर दि. ७ मार्च २०२३ रोजी शुभम सुळगेकर आणि त्याचे मित्र मच्छे येथे शेतामध्ये पार्टी करत होते. त्यावेळी पाण्याच्या बाटलीवरून वादावादी झाली. शुभमला मारहाण झाली. त्यानंतर दोन्ही गटातील तरुणांनी इतर मित्रांना बोलावले. दुपारी १२.३० च्या दरम्यान मच्छे येथे जोरदार वाद झाला. यावेळी प्रवीण उर्फ छोट्या बलगण्णावर याने दुचाकीतील स्क्रू ड्रायव्हर घेऊन प्रतीकच्या डोक्यावर आणि खांद्यावर वार केले. या घटनेनंतर प्रतीकचा मृत्यू झाला होता.
या खून प्रकरणानंतर बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये सात जणांविरोधात भादंवि १४३, १४७, १४८, ३२३, ३४१, ३०७, ३०२, ५०४, ५०६, सहकलम १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधील संशयित महेंद्र तळवार याने येथील ११ वे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामीनसाठी अर्ज दाखल केला होता.
मात्र, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याठिकाणी न्यायालयाने त्याला १ लाख रुपयाचे वैयक्तिक हमीपत्र आणि तितक्याच रकमेचा एक जामीनदार या अटींवर जामीन मंजूर केला आहे. या संशयिताच्यावतीने ऍड. नागरत्ना पत्तार, ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. हेमराज बेंचण्णावर, ऍड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.
Belgaum Varta Belgaum Varta