बेळगाव : गोवावेस येथील खाऊ कट्ट्याच्या दुकानाचा मुद्दा चांगलाच रंगला आहे. वादग्रस्त ठरलेल्या खाऊ कट्ट्यासंदर्भात असलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत सरकारने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विशेष पथकाकडून चौकशी केली जात आहे. या चौकशी दरम्यान वार्ड क्रमांक 23 चे नगरसेवक जयंत जाधव तसेच वार्ड क्रमांक 41 चे नगरसेवक मंगेश पवार या दोघांनी दिनदलित गरजू गरीब लोकांसाठी तयार केलेल्या खाऊ कट्ट्यातील दुकाने स्वतःच्या कुटुंबीयांच्या नावाने बळकावली आहेत. खाऊ कट्ट्यामधील दुकान क्रमांक 29 हे सध्या सोनाली जयंत जाधव तर गाळा क्रमांक 28 हे नीता मंगेश पवार यांच्या नावावर आहे. सदर प्रकार कर्नाटक नगरपालिका कायदा 1976 च्या कलम 26(1)(के) नुसार उल्लंघन करणारा आहे. तरी या प्रकरणी निःपक्षपातीपणे चौकशी करून नगरसेवक जयंत जाधव व मंगेश पवार यांच्यावर कारवाई करावी व महानगरपालिकेतील त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे अशा आशयाची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी प्रादेशिक आयुक्तांकडे लिखित तक्रारीत केलेली आहे.
सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत प्रादेशिक आयुक्तांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. पुराव्यानिशी नगरसेवक जयंत जाधव आणि मंगेश पवार यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चौकशी लक्षात घेता या दोन्ही नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द होणार की नेमकी कोणती कारवाई होणार याकडे बेळगाववासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
बसवेश्वर सर्कल गोवावेस येथील खाऊ कट्टा येथील दुकाने समाजातील दीनदुबळ्या गरीब होतकरू लाभार्थींना देणे बंधनकारक होते. मात्र दक्षिणच्या आमदारांच्या खास मर्जीतील काही पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर ही दुकाने झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेवर अन्याय झालेला आहे. नगरसेवक मंगेश पवार आणि जयंत जाधव यांनी नगरसेवक पदावर विराजमान झाल्यानंतर वास्तविक या दुकानांचा हक्क सोडून देणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता त्यांनी आपली दुकाने आपल्या पत्नीच्या नावे करून सरकारी मालमत्ता बेकायदेशीररित्या बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे अशा भ्रष्ट नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सुजित मुळगुंद यांनी प्रादेशिक आयुक्तांकडे केलेली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta