बेळगाव : तारांगण व बादशाह मसाले यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावमधील महिलांसाठी पाककला स्पर्धा तसेच काव्यवाचन मैफल अशा सुंदर कार्यक्रमाचे आयोजन तारांगणच्या मुख्य संचालिका अरुणा गोजे पाटील यांनी आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावमधील क्रीडा क्षेत्रातील अतिशय नावाजलेले व्यक्तिमत्व सूर्यकांत हिंडलगेकर उपस्थित होते. त्याचबरोबर बेळगाव व हुबळी परिसराचे बादशाह मसाल्याचे प्रमुख डिस्ट्रीब्यूटर श्री. महांतेश सक्रीगोळ, सरिता सक्रीगोळ
त्यांच्या सहायक सचिव सौ. रेखा देसाई आणि पाककृती स्पर्धेच्या परिक्षक म्हणून सौ. शिल्पा राजपुरोहित उपस्थित होत्या.
कार्यक्रमात सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपीठावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. सूर्यकांत हिंडलगेकर सर यांना कर्नाटक सरकारचा राज्यस्तरीय रोलर स्केटिंग क्रीडा क्षेत्राचे उत्तम परीक्षक म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल तारांगणतर्फे त्यांना मानचिन्ह व शाल देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर सूर्यकांत हिंडलगेकर व महांतेश सक्रीगोळ यांनी मार्गदर्शनात महिलांनी आपल्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी नेहमीच स्वतःमधील गुणांना विकसित करावे असे सांगितले.
यानंतर काव्य मैफिलीला सुरुवात झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी हुंदरे यांनी केले. प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा परिचय प्रा. मनीषा नाडगौडा यांनी करून दिला. काव्यमैफिलीत सुरुवातीला सौ. अस्मिता आळतेकर यांनी क्षितीजाचा उंबरठा, सौ.धनश्री मुचंडी- पैठणी, श्रीमती अस्मिता देशपांडे – बाई मी ऑनलाईन शिकवित होते हे विडंबन काव्य, सौ.शारदा भेकणे – अरे संसार संसार विडंबन काव्य, श्रीमती प्रतिभा सडेकर- सध्याची दिवाळी, कु.अंजली देशपांडे – संध्या, श्रीमती शीतल पाटील- आली दिवाळी, प्रा. मनिषा नाडगौडा – राजौरी शहिदांना नमन, श्रीमती रोशनी हुंदरे- कालिका रुपी, अशा नवदुर्गांनी आपल्या कविता सादर केल्या. शेवटी कार्यक्रमांमध्ये पाककला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला यावेळी अमिषा मांगले-प्रथम क्रमांक, संजीवनी कुलकर्णी -द्वितीय क्रमांक, आरती रायकर – तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आले. विजेत्यांना बादशहा मसाले यांच्यातर्फे सदिच्छा भेट व प्रशस्तीपत्र देण्यात आले त्याचबरोबर कविता सादर केलेल्या कवयित्रींना प्रशस्तीपत्र आणि बादशाह मसाला पाऊच देण्यात आले. प्रायोजिका नयन मंडोळकार यांचा भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात शेवटी श्रीमती अस्मिता देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी तारांगणच्या मुख्य अरुणा गोजेपाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले, तसेच तारांगणच्या सर्व सदस्यांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले. तारांगण संचालिका जयश्री दिवटे, नेत्रा मेनसे, स्मिता मेंडके, अर्चना पाटील, सुजाता पाटील, उपस्थित होत्या.