निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर हालसिद्धनाथ साखर कारखाना प्रवेशद्वारा समोर कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सायकलस्वार दिनकर रामचंद्र दिंडे (वय ७५ रा. सौंदलगा) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी झाला. घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात झाली आहे.
सौंदलगाव येथून निपाणी येथे सायकलवरून कामानिमित्त दिनकर हे निपाणीकडे येत होते. त्यांची सायकल हालशुगर कारखाना प्रवेशद्वारासमोर आली असता फरशी उतरून निपाणीच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने दिंडे यांच्या सायकलला मागून धडक दिली. यात दिंडे हे सायकलवरून उडून कंटेनरच्या मागील चाकात सापडल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार आणि सहकाऱ्यांनी धाव घेऊन घटनास्थळीची पाहणी केली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.