बेळगाव : हलगा गावानजीकचा अलारवाड अंडर ब्रिज सर्कल आणि हलगा -बेळगाव सर्व्हिस रोड रस्त्याच्या तात्काळ दुरुस्तीसह आपल्या अन्य मागण्यांची येत्या चार दिवसात पूर्तता न झाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा हलगा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना आज दिला.
हलगा ग्रामस्थांनी आज शनिवारी सकाळी सामाजिक कार्यकर्ते ॲड. अण्णासाहेब घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त इशाऱ्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकाने निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. आपल्या मागण्या संदर्भात प्रसिद्धी माध्यमाला माहिती देताना ॲड. अण्णासाहेब घोरपडे म्हणाले की, अलारवाड अंडर ब्रिज सर्कल येथे चारी बाजूने रस्ते एकत्र येतात. या सर्कल मधून दररोज हजारो वाहने ये -जा करत असतात.
त्याचप्रमाणे या ठिकाणी हलगा परिसरातील गावांमधील लोक, कामगार व शेतकऱ्यांची सतत वर्दळ असते. मात्र अलीकडच्या काळात सदर सर्कल मधील रस्त्याची खाचखळगे पडून वाताहात झाली आहे. याखेरीज या ठिकाणी कोणतेही साईन बोर्ड, स्पीड ब्रेकर, सिग्नल वगैरे काहीच नाही. परिणामी या सर्कलच्या ठिकाणी आठवड्याला किमान दोन-तीन अपघात होत असतात.
येथील अपघातामुळे बऱ्याच जणांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळे या सर्कलच्या ठिकाणचा रस्ता तात्काळ चांगला दुरुस्त करून त्या ठिकाणी सिग्नल, स्पीड ब्रेकर वगैरेंची व्यवस्था केली जावी. याशिवाय तेथून जवळच असलेल्या कार कंपनी समोरील बेळगावकडे येणाऱ्या रस्त्यावर वारंवार अपघात घडत आहेत, त्याकडे लक्ष द्यावे. याव्यतिरिक्त बस्तवाडला जाण्यासाठी जो खालचा हलगा -बेळगाव सर्व्हिस रोड हा रस्ता मंजुनाथ राईस मिल आणि अशोक लेलँड मोटर्स दरम्यान धोकादायक बनला आहे. तेंव्हा या ठिकाणीही सिग्नल व स्पीड ब्रेकर्स बसवणे आवश्यक आहे. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग खात्याला सदर मागण्यांची पूर्तता करण्याची सत्ता आदेश द्यावेत. आमच्या मागण्या जर येत्या चार दिवसात पूर्ण नाही झाल्या तर हलगा परिसरातील सर्व कामगारवर्ग, शेतकरी आणि ग्रामस्थ मिळून सुवर्णसौध येथे रास्ता रोको करतील असा इशाराही आम्ही दिला आहे, अशी माहिती ॲड. घोरपडे यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी ॲड. घोरपडे यांच्यासह ॲड. एम. एस. नंदी, अनंत घोरपडे, सदानंद बेळगोजी, दिगंबर धोंगडे, मोहन काकतकर, कृष्णा चौगुले, किरण हणमंताचे आदींसह हलगावासीय बहुसंख्येने उपस्थित होते.