Sunday , September 8 2024
Breaking News

समिती कार्यकर्त्यांनी माफीचे साक्षीदार बनू नये : प्रकाश मरगाळे

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक प्रशासनाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारल्यामुळे समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक ४ डिसेंबर रोजी शिनोळी येथे रास्तारोको करण्यात आला होता. रास्तारोको केल्यामुळे चंदगड पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे कोल्हापूर पोलिस प्रशासनाने मागे घ्यावेत असे निवेदन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कांही कार्यकर्त्यांनी कोल्हापूर जिल्हा पोलिस प्रमुखांकडे सादर केले. काही समिती कार्यकर्त्यांनी केलेल्या या प्रकारामुळे सीमा लढ्याची आधार बोथड होते की काय अशी भीती व्यक्त होत आहे.
याबाबत “बेळगाव वार्ता”शी बोलताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे म्हणाले की, समिती कार्यकर्त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्यावरील गुन्हे मागे घ्या अशा प्रकारची मागणी करणे हे अत्यंत चुकीचे आहे. जवळपास 50 वर्षापासून आम्ही या चळवळीत आहोत. 1975 साली मोरारजी देसाई यांची सभा उधळण्यात आली होती. त्यावेळी सुभाष जाधव जगदीश सारडा या सीमा लढ्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांवर देखील गुन्हे घालण्यात आले होते. तसेच 1985 साली देखील आम्ही रास्तारोको केला होता. त्यावेळी देखील आमच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा 1994 साली महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते घोषणा देत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात शिरले होते. त्यावेळी देखील कोल्हापूर पोलीस प्रशासनाने समिती कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवले होते. त्यानंतर 2002 साली मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखाली चलो नागपूर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी देखील समितीच्या जवळपास 100 कार्यकर्त्यांवर व पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करून कळंबा जेलमध्ये तेरा दिवसाचा कारावास झाला होता. सीमा लढा ही एक चळवळ आहे. लढा देत असताना वेळोवेळी अशा प्रकारचे गुन्हे नोंद होतच राहणार. समिती कार्यकर्त्यांनी एकजुटीने हा लढा दिला पाहिजे. कोणासमोर ही जाऊन आमच्यावरील गुन्हे मागे घ्या अशी याचना करणे हे चुकीचे आहे. पुढे जाऊन कर्नाटक प्रशासनाने जर समिती कार्यकर्त्यांवरील सर्व गुन्हे मागे घेतले तर आपण हा सीमा लढा विसरून कर्नाटकातच राहणार आहोत का? असा संतप्त सवाल देखील यावेळी खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी उपस्थित केला.
सीमाप्रश्नासंदर्भात कोणतेही पाऊल उचलताना कार्यकर्त्यांनी प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करून पाऊले उचलली पाहिजे. कारण सीमा लढा हा जवळपास 40 लाख जनतेने 70 वर्षांपासून चालविलेला एक लढा आहे. या लढ्याला काही कार्यकर्त्यांच्या अविचारी निर्णयामुळे मूठमाती देऊ नये. महाराष्ट्रातील नेत्यांशी कोणत्याही प्रकारची चर्चा किंवा मागणी करण्यापूर्वी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून मगच कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. सीमा लढ्याला हानिकारक होतील अशा कोणत्याही गोष्टी कार्यकर्त्यांनी करू नये. तरच हा सीमा लढा टिकून राहणार आहे. निदान यापुढे तरी कार्यकर्त्यांनी माफीचा साक्षीदार बनू नये, असे खजिनदार प्रकाश मरगाळे म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *