मंत्री जमीर अहमद यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक
बेळगाव – काँग्रेस पक्ष संविधानानुसार चालणारा पक्ष आहे, याउलट भारतीय जनता पक्ष संविधान आणि संसदीय व्यवस्थेच्या विरोधी आहे. भारतीय जनता पक्ष उत्तर कर्नाटकातील जनतेच्या विरोधात काम करत आहे. हिवाळी अधिवेशनात वेळ वाया घालवण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी चालविले आहे. हा या राज्यातील जनतेशी केलेला द्रोह आहे, अशी टीका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज सोमवारी विधानसभेत बोलताना केली.
सोमवारी सकाळी विधानसभेचे कामकाज चालू होताच, प्रश्नोत्तराच्या काळात भाजप सदस्यांनी मंत्री जमीर अहमद यांनी सभापती पदावरून वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे संविधानाचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे सरकारने मंत्री जमीर अहमद यांना निलंबित करावे, अशी आग्रही मागणी करत सभापतींच्या आसनासमोर धरणे आणि घोषणाबाजी सुरू केली. संपूर्ण दिवस भाजप सदस्यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवताना, मंत्री जमीर अहमद यांच्या निलंबनाची कारवाई लावून धरली.
त्यानंतर विरोधकांच्या आक्रमक पवित्र्याला उत्तर देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, भाजप सदस्यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा मुद्दा का उपस्थित केला नाही. जर या मुद्द्यावर विरोधकांना बोलायचे असेल तर त्यांनी नोटीस देणे आवश्यक होते. मात्र तसे न करता अचानकपणे मंत्र्यांच्या निलंबनाच्या कारवाईची मागणी नियमात बसणारी नाही. सरकार विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी समर्थ आहे. भाजप सदस्य राज्यातील, उत्तर कर्नाटकातील तसेच दुष्काळावर बोलण्यासाठी इच्छुक दिसत नाहीत. अशा प्रकारचे धरणे धरून ते अधिवेशनाचा वेळ वाया घालवत आहेत. भाजप राज्यातील जनतेशी द्रोह करत आहे. भाजप संविधान आणि संसदीय व्यवस्थेच्या विरोधात आहेत. असा आरोपही सिद्धरामय यांनी यावेळी केला.
Belgaum Varta Belgaum Varta