बेळगाव : बेळगावच्या सांबरा विमानतळाला राष्ट्रपुरुष पुरुषांचे नाव देण्यात यावे यासाठी विविध संघटनांनी मागणी केली आहे. दरम्यान आज विधानसभेत आमदार कोनरेड्डी यांनी बेळगावच्या विमानतळाला वीर राणी कित्तूर चन्नम्मा असे नाव देण्यात यावे अशी मागणी केली. याचवेळी आमदार बेल्लद यांनी हुबळीच्या विमानतळाला क्रांतिवीर संगोळी रायण्णा नाव देण्याची मागणी केली. सदर मागणी त्वरित मान्य केली जावी असे आवाहन आमदार बसवराज पाटील यतनाळ यांनी केले.
यावेळी बोलताना मंत्री एम. बी. पाटील म्हणाले, सदस्यांच्या मागणीनुसार दोन्ही सदनात बेळगाव आणि हुबळीच्या विमानतळाला राष्ट्रवीरांचे नाव देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. मात्र सदर विमानतळाला नाव देण्याचा अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. सदस्यांनी केलेल्या मागणीनुसार बेळगावाच्या विमानतळाला वीर राणी कित्तूर चन्नम्मा तसेच हुबळीच्या विमानतळाला क्रांतिवीर संगोळी रायण्णा नाव देण्यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू तसेच या संदर्भात त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल असेही एम. बी. पाटील यांनी स्पष्ट केले. संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनीही सर्वांचे सहमतीने यावर निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.
Belgaum Varta Belgaum Varta