
बेळगाव : वैद्यकीय प्रतिनिधींची कामाची वेळ 8 तास निश्चित करावी, वेतनात वाढ करावी आदी मागण्यांसाठी बेळगाव मेडिकल व सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह संघटनेच्या सदस्यांनी बेळगावात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
मेडिकल व सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करणाऱ्या विक्री प्रतिनिधींना कामाची वेळ 8 तास निश्चित करावी, वेतनात वाढ करावी, बीपी, शुगरवरच्या औषधांसारख्या औषधांच्या किमती कमी करण्याची मागणी करत वैद्यकीय व विक्री प्रतिनिधी संघटनेच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज घोषणा देत आंदोलन करण्यात आले.
या संदर्भात माहिती देताना बेळगाव मेडिकल व सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचे पदाधिकारी शीतल अनगोळकर यांनी सांगितले की, वैद्यकीय आणि विक्री प्रतिनिधींना अत्यंत कमी वेतनात 8 तासांहून अधिक काळ काम करावे लागते. हा आमच्यावर अन्याय आहे. याला विरोध करून 8 तास कामाची वेळ ठरवावी, जीवनावश्यक औषधे आणि वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी हटविण्याच्या मागणीसाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत. बेळगाव मेडिकल व सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचे सचिव सुजय गणपतराव पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने वैद्यकीय व विक्री प्रतिनिधींच्या कामाची वेळ 8 तास निश्चित करावी, बीपी, शुगर सारख्या आजारांवरील जीवनावश्यक औषधांच्या किमती कमी कराव्यात आणि औषधे व वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी हटवावा, आम्हाला ट्रॅक करण्यासाठी जीपीआरएस यंत्रणा काढून टाकावी, या आमच्या मागण्यांना सरकारने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, यासाठी आम्ही देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून बेळगावात आज हे आंदोलन छेडले आहे. त्याची दखल न घेतल्यास भविष्यात उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनात बेळगाव शहरासह जिल्ह्यातील वैद्यकीय व विक्री प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta