बेळगाव : सेवेत कायम करावे या मागणीसाठी बेळगाव जिल्हा प्रथम श्रेणी महाविद्यालयांच्या अतिथी व्याख्याता संघटनेच्या सदस्यांनी आज एका पायावर उभे राहून अनोखे आंदोलन केले. शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालयात कार्यरत व्याख्यात्यांना सेवेत कायम करावे, त्यांना सामाजिक सुरक्षा देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी अतिथी व्याख्यात्यांनी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत एका पायावर उभे राहून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
या आंदोलनाबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना बेळगाव जिल्हा गेस्ट लेक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अडीवेप्पा इटगी यांनी सर्व अतिथी व्याख्यात्यांना सेवा सुरक्षा देण्याची मागणी केली. गेस्ट लेक्चरर्सच्या आंदोलनामुळे गरीब विद्यार्थ्यांची, शेतकऱ्यांच्या मुलांची अडचण होत आहे, सरकारी कॉलेजमधील 90% शिक्षक हे गेस्ट लेक्चरर्स आहेत. मागील अधिवेशनात विरोधी पक्षनेते असणारे सिद्दरामय्या यांनी आमच्या मागण्यांवर सभागृहात अर्धा तास चर्चा केली होती. मात्र आता सत्तेवर आल्यावर ते व त्यांचे सरकार आमच्या मागण्यांकडे डोळेझाक करत आहेत. आमची मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आमच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अंगी तुमकूर सिद्धगंगा मठ ते बेंगळुर सुवर्णसौधपर्यंत मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या प्रथमश्रेणी सरकारी महाविद्यालयातील अतिथी व्याख्यात्यांनी या आंदोलनात भाग घेतला.