
बेळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वैद्यकीय मदत कक्ष उभा केला आहे. त्यातून महाराष्ट्रातील असंख्य लोकांना वैद्यकीय सुविधा मिळाल्या आहेत. आजपर्यंत सुमारे दीडशे कोटी रुपयांचा निधी या वैद्यकीय मदत कक्षाद्वारे वाटप करण्यात आला आहे. हीच वैद्यकीय सेवा सीमाभागातील लोकांसाठी लागू करण्यात आली होती. मात्र त्यासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता करणे सीमावासियांना कठीण जात होते. ही बाब म. ए. समितीने त्यांच्या लक्षात आणून देताच समिती नेते रमाकांत दादा कोंडुसकर यांनी महिनाभरापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली होती व या वैद्यकीय कक्षातून मदत मिळविण्याकरिता ज्या कागदपत्रांची जोडणी करावी लागते त्यात थोडा बदल करण्याची विनंती केली होती व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिफारस पत्र बंधनकारक करण्याची देखील विनंती केली होती. मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सीमाभागासाठी एक वेगळा अध्यादेश काढून तो मान्य करून घेऊन प्रथमच सीमाभागात वैद्यकीय मदत कक्षातून निधी पोहोचविण्यासाठी काही नियम शिथिल केले आणि सीमावासियांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी एक प्रकारे मदतच केली आहे.
नुकतेच खानापूर तालुक्यातील रंजना रवींद्र देसाई नामक रुग्णाला हृदय रोगावर गंभीर शस्त्रक्रिया करण्यासाठी मुख्यमंत्री विशेष मदत निधीतून एक लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती नेते मालोजीराव अष्टेकर आणि रमाकांत कोंडुसकर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. तर ही योजना सीमावासीयांपर्यंत पोचविण्यासाठी मंगेश चिवटे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
ज्यांना वैद्यकीय कक्षातून मदत हवी असेल त्यांनी मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्याशी संपर्क साधून खडक गल्ली कार्यालयातील भेट द्यावी.
Belgaum Varta Belgaum Varta