
बेळगाव : महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय मदत कक्षातून सीमावासीयांना अर्थसहाय्य देण्यास प्रारंभ करण्यात आला असून, येथील एका भगिनीला उपचारांसाठी निधी देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख व मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बेळगावात मराठा मंदिर सभागृहात आज, गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्राचे वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख व मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांनी ही माहिती देऊन सांगितले की, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आणि सीमाभागातील मराठी माणसाच्या रक्षणासाठी प्रथम प्राधान्य देण्याचे जाहीर केले होते. आपले गुरु आनंद दिघे यांच्या सूचनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नाच्या आंदोलनात भाग घेऊन कारावास भोगला आहे. त्यामुळे सीमावासीय आणि सीमाप्रश्न हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्यामुळे वैद्यकीय मदत कक्षाचे पुनर्गठन केल्यानंतर महाराष्ट्रातील नागरिकांप्रमाणेच सीमाभागातील मराठी भाषिकांनाही वैद्यकीय मदत देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे सीमाभागातील मराठी भाषिकांनाही वैद्यकीय मदत देण्यास विलंब झाला हे खरे, पण इथून पुढे नियमितपणे अशी मदत सीमावासीय मराठी भाषिकांना देण्यात येईल. वैद्यकीय मदत कक्षाचे पुनर्गठन केल्यानंतर आजपर्यंत १८१ कोटींची आर्थिक मदत वैद्यकीय उपचारांसाठी देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तब्बल २१ हजार नागरिकांचे प्राण वाचू शकले असे चिवटे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला हातकणंगले मतदार संघाचे खासदार व महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, नेते रणजित चव्हाण-पाटील, रमाकांत कोंडूसकर, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta