
बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना यांच्या वतीने प्रतिवर्षी जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले जात असते. यावर्षी शनिवार दिनांक 13 व आज रविवार दिनांक 14 जानेवारी रोजी प्रथमच गुणांवर आधारित मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. काल सायंकाळी भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते फीत कापून तसेच हनुमान प्रतिमेचे पूजन करून कुस्ती आखाड्याचे उद्घाटन करण्यात आले. माजी आमदार परशुराम नंदिहळ्ळी, डॉ. गणपत पाटील, स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कलघटगी, उद्योगपती भूषण काकतकर, कुस्ती संघटनेचे अध्यक्ष मारुती घाडी, हिरालाल चव्हाण, पोमानी कुन्नुरकर आदी मान्यवरांच्या उपस्थिती स्पर्धांना थाटात प्रारंभ झाला आहे.

बेळगावच्या प्रसिद्ध आनंदवाडी आखाड्यात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बेळगाव केसरी मॅटवरील सदर स्पर्धा महिला व पुरुष गटात तसेच विविध वजनी गटात आयोजित करण्यात आली आहे. तसेच बालकेसरी बेळगाव, महिला बेळगाव केसरी, बेळगाव केसरी किताबासाठी होणाऱ्या स्पर्धेतील विजेत्यांना चांदीची गदा, रोख रक्कम, प्रमाणपत्र व चषकही देण्यात येणार आहे. या स्पर्धेत तब्बल 550 हून अधिक कुस्तीगीरांनी नाव नोंदणी केली आहे. यामध्ये ही प्रामुख्याने 160 हून अधिक महिला कुस्तीगीरांनी बेळगाव केसरी स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला आहे. शनिवारी दुपारी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध गटातील चटकदार कुस्त्या लावल्या जात आहेत.
प्रथमच राज्यस्तरीय मॅटवरील महिला आणि पुरुषांच्या विविध गटातील स्पर्धा आयोजित करण्यात आल्यामुळे कुस्ती शौकीनांचे बेळगावात होणाऱ्या बेळगाव केसरी आखाड्याकडे लक्ष लागून राहिले होते. मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने दोन दिवस होणाऱ्या बेळगाव केसरी आखाड्यासाठी जंगी तयारी केली आहे. दरम्यान आजच्या पहिल्या दिवशी मॅटवरील कुस्ती पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांसह, शाळा कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच पालक महिला बहुसंख्येने आनंदवाडीच्या आखाड्यात पाहायला मिळत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta