
बेळगाव : अक्कलकोटहून निघालेल्या आणि काल बेळगावात आगमन झालेल्या स्वामी समर्थांच्या पालखीचे काल शनिवारी सायंकाळी महाद्वार रोड येथील श्री स्वामी समर्थ आराधना केंद्राच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.सवाद्य निघालेल्या पालखी मिरवणुकीत बसवाणी बँड, ढोल पथक, जुना भाजी मार्केट व ज्योती नगर कंग्राळी येथील भजनी मंडळे सहभागी झाली होती. संपूर्ण मार्गावर भक्तांकडून पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्याचबरोबर जय जय स्वामी समर्थ जयघोष सुरू होता.
पालखी महाद्वार रोड इथून वाजत गाजत निघून भांदूर गल्ली मधून हेमु कलानी चौकाकडून तासिलदार गल्ली, तानाजी गल्ली अशी परिक्रमा करीत पालखी रात्री आराधना केंद्राकडे येऊन विसावली होती. आज रविवारी सकाळी पालखी आणि पादुकांचे पूजन करण्यात आले. हजारो स्त्री-पुरुष भक्तांनी भेट देऊन पादुकांचे दर्शन घेतले.
संपूर्ण परिक्रमे दरम्यान पालखी सोबत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ देवस्थानचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्यासह अन्य कार्यकारी सदस्य जातीने लक्ष ठेवून आहेत. आराधना केंद्राचे अध्यक्ष नारायण पाटील, सुनिल चौगुले, विकास मजुकर, बुडाचे माजी अध्यक्ष संजय बेळगावकर, राजू गोजगेकर, मधु गुरव, रवी मोरे, संजय सुळगेकर, श्रीपाद पाटील, अनिल शहा, प्रसाद नार्वेकर, बाळू पाटील, राहुल मुचंडी, चेतन चौगुले, संजय बर्डे, आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta