
येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने आयोजित 19 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार (ता. 11) फेब्रुवारी 2024 रोजी श्री शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संपादक, लेखक, स्तंभलेखक राजकीय विश्लेषक व सकाळ माध्यम समूहाचे श्रीराम पवार यांची निवड करण्यात आली आहे. श्रीराम पवार हे कोल्हापूरचे असून पत्रकारितेत गेली 30 वर्षे ते विविध पदावर कार्यरत आहेत, त्यांनी बातमीदार, मुख्य बातमीदार, सहाय्यक वृत्तसंपादक, सहयोगी संपादक, कार्यकारी संपादक, उपमुख्य संपादक, आणि मुख्य संपादक अशी पदे त्यांनी भूषविली आहेत. ते एक लेखक, स्तंभलेखक, टीव्ही पॅनेलिस्ट, सतत राष्ट्रीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी वर लेखन त्यांनी केले आहे. त्यांचे पावर पॉइंट आणि करंट अंडरकरंट हे लोकप्रिय स्तंभ आहेत. राजकारणावरील प्राईम टाईम टीव्ही चर्चेमध्ये नियमित त्यांचा सहभाग असतो. राजकीय सर्वेक्षणाचा प्रदीर्घ अनुभव, संयुक्त राष्ट्र आमसभा जी.20 परिषदेसाठी पंतप्रधानाच्या अमेरिका, फ्रान्स, जर्मनी दौऱ्यासह मीडिया शिष्टमंडळात त्यांनी भाग घेतला होता, ते एक चांगले लेखक असून त्यांच्या नावावर अनेक पुस्तके आहेत, त्यामध्ये धुमाळी, राजपथ, जगाच्या अंगणात, मोदी पर्व, ड्रॅगन उभा दारी, अस्वस्थ पर्व, मोदी ट्वेन्टी, त्याचबरोबर त्यांची काही पुस्तके पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी निवडली गेली आहेत. पत्रकारितेतील असाधारण योगदानासाठी दिनमित्रकार मुकुंदराव पाटील पुरस्कार, अत्रे फाउंडेशनतर्फे आचार्य अत्रे पुरस्कार, ज्येष्ठ संपादक पुरस्कार, कोल्हापूर भूषण पुरस्कार, पत्रकारितेतील आचार्य अत्रे पुरस्कार, असे विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ते 19 व्या येळळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. 19 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन पाच सत्रात होणार आहे. यावर्षी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी श्री चांगळेश्वरी मंदिरापासून सुरू होणार असून, संमेलन मंडप श्री शिवाजी विद्यालयाच्या आवारामध्ये असणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta